गुन्हेगारीचे जंक्शन हा ‘शिक्का’ आता पुसायला हवा


जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांचे भुसावळातील शांतता समितीच्या बैठकीत आवाहन

भुसावळ : भुसावळातील भाईगिरी सर्वदूर चर्चेत असून शहराचे नाव खराब होवू देवू नका, शहराचा नावलौकीक वाढवण्याासाठी प्रयत्न करा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी येथे केले. भुसावळ शहरातील अहिल्या देवी कन्या विद्यालयात झालेल्या गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी व शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होत्ते. जिल्हाधिकारी म्हणाले की, उत्सहात सण साजरे करा, पथदिवे, रस्ते या दरवर्षाच्या समस्या असल्यातरी त्या सोडवल्या जाणार असल्याचे ते म्हणाले.

नागरीक म्हणाले गुन्हेगारीसह छेडखानीच्या घटना वाढल्या
नगरसेवक प्रा.दिनेश राठी यांनी भजे गल्लीत मद्यपींचा उपद्रव असल्याने तेथे बंदोबस्त वाढवण्याची मागणी केली. नगरसेवक मुकेश गुंजाळ यांनी शहरातील वाढती गुन्हेगारी तसेच छेडखानी वाढल्याचे सांगितले. प्रशांत वैष्णव यांनी पथदिवे बंद असून हायमास्ट बंद असल्याचे सांगितले तर सुनील ठाकूर यांनी दिवसाढवळ्या पथदिवे सुरू असतात रात्री मात्र बंद असतात असे सांगून कॉलेज, क्लासबाहेर रोडरोमिओंचा त्रास वाढल्याचे ते म्हणाले शिवाय गुन्हेगारी वाढल्याची तक्रार त्यांनी केली. प्रा.धीरज पाटील यांनी पोलिसांची संख्या वाढवण्याची मागणी केली.

भुसावळात विघ्नहर्त्याचे खडतर मार्गातून आगमन
सोमवार, 2 सप्टेंबर रोजी विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन होत असून शहर व बाजारपेठ पोलिस ठाणे हद्दीत 188 श्री मंडळांकडून विघ्नहर्त्या जल्लोषात व भक्तीभावपूर्ण वातावरणात स्थापना होत आहे. असे असलेतरी शहरातील प्रमुख मार्ग जर्जर झाल्याने खडतर मार्गातून बाप्पांचे आगमन झाल्याने गणेश भाविकांनी सत्ताधार्‍यांविषयी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण होणार असलेतरी ते नेमके कधी व कशा पद्धत्तीने होणार? हे प्रश्‍न अनुत्तरीत आहेत. डांबरीकरणापूर्वी पालिकेला शहरातील रस्त्यांची डागडूजी करणे सहज शक्य होते मात्र रस्त्यांची डागडूजीदेखील झाली नसल्याने शहरवासीयांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. आगामी निवडणुकीत सत्ताधार्‍यांना याचा जाब नागरीक विचारतील यात शंका नसावी !


कॉपी करू नका.