मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडील वॉशिंग पावडरने भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नेते होतात स्वच्छ


माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांचा पक्षाला पुन्हा घरचा अहेर : पक्षात येणार साधू -संत नाही

जळगाव : ‘पार्टी विथ डिफरन्स’ असलेल्या पक्षाचा मुख्यमंत्र्यांना विश्वास असून भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या वॉशिंग पावडरने स्वच्छ केले जाते व नंतर हे नेते कामाला लागतात, असा टोला माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी स्व-पक्षालाच लगावल्याने राजकीय गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना खडसे म्हणाले की, भाजपा होणार्‍या इनकमिंग नेत्यांसाठी आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे, असे मुख्यमंत्री सांगतात त्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना वॉशिंग पावडरने स्वच्छ करून पक्षात घेतले जाते शिवाय पक्षात घेतल्यानंतर त्यांना क्लीन चिट दिली जाते आणि त्यानंतर ते पुन्हा आपल्या कामाला लागतात, असे सांगण्यासही खडसे विसरले नाहीत.

भाजपात येणारे नक्कीच साधू संत नाहीत : खडसेंनी पक्षाचे टोचले काम
माजी मंत्री खडसे म्हणाले की, भाजपा हा आमचा पक्ष ‘पार्टी विथ डिफरन्स’ आहे, असा मुख्यमंत्र्यांना विश्वास असून भाजपमध्ये येणारे नक्कची साधू-संत नाहीत. सत्तेची ऊब मिळावी यासाठी हे सगळे येत आहेत. भाजपची नीती मूल्य मान्य म्हणून सर्व काही भाजपात प्रवेश घेत आहेत, असेही काहीही नाही मात्र भाजपा पक्ष वाढवण्यासाठी चांगल्या लोकांना पक्षात घ्यावे लागते मात्र चांगल्या लोकांची व्याख्या ठरवत असताना, दुमत होऊ शकते, असे मार्मिक विधानही एकनाथराव खडसे यांनी करून नव्या राजकीय समीकरणांना वाव दिल्याचे बोलले जातत आहे. जळगाव येथील घरकुल घोटाळ्याचा निकाल, भाजपामध्ये सुरू असलेले इनकमिंग आणि नारायण राणे यांचा भाजपा प्रवेश इत्यादी विषयांवर खडसे यांनी यावेळी वृत्तवाहिनीशी बोलताना रोखठोक मते मांडली.


कॉपी करू नका.