भुसावळात गणेश विसर्जन व निर्माल्य संकलन होणार
प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाचा उपक्रम
भुसावळ- आपली संस्कृती पर्यावरण पूरक आहे. पर्यायाने आपले उत्सवही पर्यावरण पूरक असावे मात्र अलीकडे उत्सवाचेे स्वरूप बदलत चालले असून उत्सवाच्या नावाखाली पर्यावरणाची अपरीमित हानी होत आहे. त्यामुळेेे मूळ हेतूपासून गणेशोत्सवही दुरावत चालल्याने सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून येथील महिला महाविद्यालयाच्या पर्यावरण समितीतर्फे गणेशोत्सवानिमित्त जनजागरण मोहीम सुरू करण्यात आली आहे.यात विद्यार्थिनींच्या माध्यमातून समाजात पर्यावरण पूरक गणेशोत्सवाची संकल्पना राबविणे गणेश मंडळांमधील ध्वनिप्रदूषण, अतिरीक्त वीज वापर, मातीच्या मूर्तीची स्थापना, निर्माल्यापासून खत निर्मिती, विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण या संदर्भात जाणीव जागृती केली जात आहे. निर्माल्यापासून महाविद्यालयात खतनिर्मिती केली जाणार आहे.
महाविद्यालयात होणार शाडू मातीच्या मूर्तीचे विसर्जन
परीसरातील नागरीकांसाठी महाविद्यालयात शाडूच्या मातीच्या मूर्तीचे विसर्जन व निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आली आहे. याचा लाभ नागरीकांनी घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.मंगला साबद्रा, उपप्राचार्य डॉ.शिल्पा पाटील, डॉ.जे.वि.धनवीच, डॉ.जीवन धांडे व पर्यवेक्षक भदाने यांनी केले आहे.