दुर्लक्षित किल्ल्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी पॉलिसी

पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती
मुंबई : लग्नसमारंभासह हॉटेलसाठी राज्यातील 25 किल्ले भाड्याने देऊन पर्यटनाला चालना देणार असल्याचे वृत्त आल्यानंतर राज्य सरकारवर टिकेची झोड उठल्यानंतर पर्यटनमंत्री जयकुमार रावल म्हणाले की, जे किल्ले पर्यटन आणि महसूल विभागाकडे असून दुर्लक्षित आहेत. या किल्ल्यांची देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी एक पॉलिसी आखण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रात तीन प्रकारचे किल्ले असून त्यात एक शिवाजी महाराजांचे किल्ले, दुसरे ऐतिहासिक व महत्वाचे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या (एएसआय) ताब्यात किल्ले आहेत. या व्यतिरिक्त तिसरे म्हणजे गावोगावी असलेले किल्ले, महसूल विभागाच्या ताब्यात असलेले किल्ले, जे कोणाच्याही ताब्यात नाहीत, अशा किल्ल्यांची देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी पर्यटन विभागाकडून एक पॉलिसी आखण्याचे काम सुरू असल्याचे जयकुमार रावल यांनी सांगितले.
किल्ल्यांचा विकास करणे हाच उद्देश
रावल म्हणाले की, जे किल्ले दुर्लक्षित आहेत शिवाय ज्या किल्ल्यांना सुरक्षारक्षक नाही त्यांचा विकास करण्यासह लाईटींग, साऊंड शो, मुझियम, नास्ता व निवासाची सोय करणे अशी पॉलिसी असून दुर्दैवाने महाराष्ट्रात इतके किल्ले असताना मागील सरकारने अशी पॉलिसी बनविली नाही, असेही रावल म्हणाले.
