वंचित आघाडीतून अखेर एमआयएम बाहेर
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बदलणार राजकीय समीकरण : जागा वाटपावरून मतभेदाने निर्णय
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडी आणि एमआयएमच्या आघाडीने भल्याभल्यांना घाम फोडल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत एमआयएमच्या भूमिकेकडे लक्ष लागले असताना जागा वाटपावरून सुरू असलेल्या धुसफूसनंतर अखेर एमआयएमने वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे घोषणा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी औरंगाबादेत केली. या निर्णयामुळे आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जागावाटपात सन्मान न ठेवल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले.
जागा वाटपाचा तिढा न सुटल्याने निर्णय
एमआयएमने वंचित बहुजन आघाडीला सुरुवातीला 100 जागांची मागणी केली होती. यानंतर एमआयएमच 75 आणि शेवटी 50 जागांवरही लढायची तयारी दर्शविली होती मात्र प्रकाश आंबेडकरांनी मागण्यांची दखल न घेत केवळ एमआयएमला केवळ आठ जागा देवू केल्याने प्रकाश आंबेडकर यांचा प्रस्ताव मान्य नसल्याचे एमआयएमने सुरुवातीलाच स्पष्ट केले होते. सरतेशेवटी या वादाची परीणती वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची युती तुटण्यात झाली आहे. दरम्यान, औरंगाबाद मतदारसंघातही एमआयएमच्या इम्तियाज जलील यांचा विजय झाला होता. या आघाडीने राज्यात अनेक ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीची धुळधाण उडवली होती. त्यामुळे अशोक चव्हाण, सुशीकुमार शिंदे, चंद्रकांत खैरे यांच्यासारख्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.