आंतरपीक नोंदीचे प्रशासनाला वावडे
सातबारा उतार्यावर आंतरपिकाची नोंद होत नसल्याने आर्थिक शेतकर्यांना आर्थिक फटका
रावेर : शेतकर्यांच्या आंतर पिकांची 7/12 उतार्यावर नोंदणी होत नसल्याने शेतकर्यांना प्रचंड आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. आंतरपिकांच्या माध्यमातून घेतलेले उत्पादन शेती उतार्यावर पीक पेर्याची नोंद नसल्याने शासनाला हमी भावामध्ये धान्य विक्री करण्यास अडचण निर्माण होत आहे. शेतकर्यांना शेतीच्या माध्यमातून आर्थिक सुबत्ता यावी म्हणून जास्तीत-जास्त आंतर पिके घेण्यासाठी शासनाकडून प्रोत्साहन दिले जाते. रावेर तालुक्यातदेखील मोठ्या प्रमाणात केळी लागवड केली असेल तर आंतर पीक म्हणून मका, गहु, हरभरा घेतला जातो परंतु या आंतर पिकांचा पेरा संबधित शेतकर्यांच्या सात-बारा उतार्यावर केला जात नाही. यामुळे आंतर पिकांच्या माध्यमातून झालेले उत्पादनाची नोंद नसल्याने शासनाला विकता येत नाही व व्यापारी कवडीमोल भावात शेतकर्यांकडून हा माल घेतात. याचा आर्थिक भूर्दंड शेतकर्यांना बसतो. आंतर पिकाची महसूल प्रशासनाने नोंद करावी, असा सूर शेतकर्यांमधून उमटत आहे.
आंतर पीक महसूल प्रशासनाने नोंदवावे
तालुक्यात बहुतांश शेतकर्यांच्या सातबार्या उतार्यावर तलाठी केळीची नोंद करतात परंतु संबंधीत शेतकरी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी रब्बीमध्ये गहु, हरभरा व मक्याचे उत्पादन घेतात परंतु उत्पादन आल्यावर शेतकरी शासनाच्या धान्य खरेदी केंद्रावर विक्रीसाठी जातो तेव्हा उतार्यावर आंतर पीक नोंदले नसल्याने धान्य खरेदी होत नाही याचा त्याला प्रचंड फटका बसतो. महसूल प्रशासनाने आंतर पीक घेणारे सर्व शेतकर्यांचे पिक पेरे नोंदले पाहिजे, असे माजी सभापती डॉ.राजेंद्र पाटील म्हणाले.

तालुक्यात आंतर पिकांचे उत्पादन अधिक
तालुक्यात बरीच केळी बागायत शेती असल्याने बरेच शेतकरी जुनारीत रब्बीचे मका, हरभरा, गव्हाचे आंतर पीक घेतात परंतु याची नोंद शेतीच्या उतार्यावर नसते. तालुक्यात मक्याचे उत्पादन हेक्टरी 80 ते 100 क्विंटल आहे तर हरभर्याचे 25 ते 30 क्विंटल असून एवढे उत्पन्न शेतकर्यांना बाहेर विकावे लागते. मी स्वत: बर्याच वेळा बाहेर विक्री केले आहे. आंतर पिकांची नोंदणी झाली असती तर शासनाला विकता आला असता परंतु आंर पीक नोंदले जात नसल्याचा फटका आम्हाला बसतो. शासनाने लवकरात-लवकर आंतर पिकाची नोंदणी सुरू करावी, असे रमजीपूरचे शेतकरी गोंडू महाजन म्हणाले.
काय आहे आंतर पीक
समजा एखाद्या शेतकर्याने एकाच क्षेत्रावर केळी लागवड केली तर तलाठी त्याच्या सातबारा उतार्यावर केळी नोंदणी ऑनलाईन करतो परंतु जर याच केळी लागवडीत त्याने मका, हरभरा किंवा गव्हाचे आंतर पिकांचे उत्पादन घेतले तर तलाठी आंतर पीक नोंदवून घेत नसल्याची ओरड शेतकर्यांमधून होत आहे. याचा फटका शेतकर्याला त्याचे उत्पादन घेतलेले धान्य शासनाला विक्री करतांना येतो. याच आंतर पिकाची उतार्यावर नोंद करण्याची मागणी शेतकर्यांकडून केली जात आहे.

