अनैतिक संबंधातून तरुणाचा खून : चौघे आरोपी जाळ्यात
खुनाचा उलगडा न होण्यासाठी मृतदेह टाकला होता रेल्वे रूळावर : पोलिसांच्या तपासात खूनाची घटना उघड
भुसावळ : अनैतिक संबंधातून रावेर तालुक्यातील सुनोदा, ता.रावेर येथील 24 वर्षीय युवकाचा खून करून त्याचा मृतदेह थेट नशिराबाद हद्दीतील रेल्वे रूळावर टाकण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी घडली होती. पोलिसांनी अत्यंत बारकाईने केलेल्या तपासाअंती तरुणाचा खून करून मृतदेह रेल्वे रूळावर आणून टाकण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते तसेच शवविच्छेदन अहवालातही ही बाब स्पष्ट झाल्याने पोलिसांनी मयताची सोशल मिडीयाद्वारे ओळख पटवल्यानंतर तांत्रिक विश्लेषणाअंती तीन आरोपींना अटक केली असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सोमवारी सकाळी शहर पोलिस ठाण्यात आयोजित पत्रकार परीषदेत दिली.
अनैतिक संबंध उघड झाल्याने तरुणाचा खून
सुनोदा येथील रहिवासी असलेल्या दीपक भगवान सपकाळे या तरुणाचे घराशेजारीच राहणार्या 21 वर्षीय विवाहितेशी अनैतिक संबंध होते व याची कुणकुण तिच्या पतीला लागल्यानंतर विवाहितेने मयत दीपक सपकाळे यास माहेरी पाडळसे येथे शनिवारी रात्री बोलावले होते. त्यानंतर 21 वर्षीय विवाहितेसह तिचा पती नितीन राजू धाडे (24, सुनोदा) व विवाहितेचा भाऊ हेमंत बाळू कोळी/तायडे (21, रा.पाडळसा) व अन्य एका विधी संघर्ष बालकाच्या मदतीने दीपक सपकाळेचा खून करण्यात आला व मृतदेह चारचाकी वाहनातून जळगाव खुर्द जवळील रेल्वे रूळावर टाकण्यात आला मात्र पोलिसांच्या तपासात खुनाची घटना उघडकीस आली.


