विनयभंगप्रकरणी पसार आरोपी यावल पोलिसांच्या जाळ्यात
यावल : तालुक्यातील अट्रावल येथे घरासमोर बांधलेली गॅलरी तोडावी लागेल, असे सांगत वाद घालत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी व 30 वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपीस सहा महिन्यानंतर अटक करण्यात आली. न्यायालयाने आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. विक्की मारोती तायडे (अट्रावल) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. अट्रावल, ता.यावल येथील 30 वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार 13 जुलै 2020 रोजी गावातील रींकु विनायक उर्फ आनंदा तायडे, विक्की मारोती तायडे सह अन्य एकाने फिर्यादीच्या घरा समोरची ओट्यावरील बांधलेली गॅलरी तोडुन टाकतो, असे बोलुन वाद घातला व फिर्यादीच्या पतीने विचारणा केल्याचा राग आल्याने तिघांनी फिर्यादीचे पती, सासरे यांना शिवीगाळ करुन मारहाण केली व लोखंडी रॉडने जीवेे ठार मारण्याच्या उद्देशाने वार केला तसेच फिर्यादीचा विनयभंग केल्याप्रकरणी यावल पोलिसात विनयभंग सह जीवे ठार मारण्याचा प्रयत्न अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून संशयीत आरोपी विक्की मारोती तायडे हा पोलिसांना गुंगारा देत होता. संशयीत गावात आल्याची गोपनीय माहिती यावल पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांना मिळाली असता शनिवारी सापळा रचुन उपनिरीक्षक जितेंद्र खैरणार सह पथकाने त्यास ताब्यात घेतले व रविवारी येथील न्यायालयात हजर केले असता त्यास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

