अनैतिक संबंधातून तरुणाचा खून प्रकरण : तिघा आरोपींना 5 पर्यंत पोलिस कोठडी
खुनाचा उलगडा न होण्यासाठी मृतदेह टाकला होता रेल्वे रूळावर : पोलिसांच्या तपासात उघड झाली खूनाची घटना
भुसावळ : अनैतिक संबंधातून रावेर तालुक्यातील सुनोदा, ता.रावेर येथील 24 वर्षीय युवकाचा खून करून त्याचा मृतदेह थेट नशिराबाद हद्दीतील रेल्वे रूळावर टाकण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली होती. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाअंती या गुन्ह्याची उकल करीत या प्रकरणी तीन आरोपींना रविवारी अटक केली होती. आरोपींना सोमवारी जळगाव न्यायालयात हजर केले असता त्यांना 5 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
अनैतिक संबंध उघड झाल्याने तरुणाचा खून
सुनोदा येथील रहिवासी असलेल्या दीपक भगवान सपकाळे या तरुणाचे घराशेजारीच राहणार्या 21 वर्षीय विवाहितेशी अनैतिक संबंध होते व याची कुणकुण तिच्या पतीला लागल्यानंतर विवाहितेने मयत दीपक सपकाळे यास माहेरी पाडळसे येथे शनिवारी रात्री बोलावले होते. त्यानंतर 21 वर्षीय विवाहितेसह तिचा पती नितीन राजू धाडे (24, सुनोदा) व विवाहितेचा भाऊ हेमंत बाळू कोळी/तायडे (21, रा.पाडळसा) व अन्य एका विधी संघर्ष बालकाच्या मदतीने दीपक सपकाळेला मारहाण करण्यात आली व कुर्हाडीने धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यावर वार करून खून करण्यात आला. खून प्रकरण अंगाशी येवू नये यासाठी आरोपींनी आपल्या ओमनी या चारचाकीतून मृतदेह नशिराबाद पोलिस ठाणे हद्दीतील जळगाव खुर्द जवळील रेल्वे रूळावर रविवारी रात्री मध्यरात्रीनंतर 1.40 वाजता आणून टाकला व त्याचवेळी दुरांतोही पास झाल्याने मृतदेहाची उजवी बाजू चिरडली गेली व त्यानंतर आरोपी वाहनाने आपल्या गावी परतले होते.

आत्महत्येच्या बनावासाठी मयताची दुचाकी घटनास्थळी आणली
मयत दीपक सपकाळे या तरुणाला विवाहितेने शनिवारी रात्री आपल्या घरी पाडळसे येथे बोलावल्यानंतर दीपक हा दुचाकी (एम.पी.09 व्ही.जी.4269) ने पाडळसे येथे रात्री आला व त्यानंतर विवाहितेने त्याला आपल्या खोलीत नेल्यानंतर दबा धरून असलेल्या तिघा आरोपींनी खोलीत प्रवेश करीत दीपकला बेदम मारहाण केली व कुर्हाडीचे घाव घालून त्याचा खून केला. त्यानंतर खून प्रकरण अंगलट येवू नये यासाठी चारचाकीत मृतदेह टाकून तो नशिराबाद हद्दीतील जळगाव खुर्द जवळील रेल्वे रूळावर आणण्यात आला. मयताची दुचाकीदेखील संशयीत घटनास्थळी घेवून आले व त्यांनी झुडूपात ती लपवून दिली. पोलिसांनी चौकशीत दुचाकी क्रमांकावरून मूळ मालकाचा शोध लावला. मयताची ओळख पटल्यानंतर त्याच्या मोबाईलवर अखेरचा कॉल आरोपी विवाहितेचा आल्यानंतर या प्रकरणाचे बिंग फुटले.
तिघा आरोपींना 5 पर्यंत पोलिस कोठडी
खून प्रकरणी मयताचे वडील रघुनाथ सपकाळे (सुनोदा, ता.रावेर) यांच्या फिर्यादीवरून आरोपी नितीन राजू धाडे (24, सुनोदा, ता.रावेर), त्याची 21 वर्षीय पत्नी तसेच आरोपीचा शालक हेमंत बाळू कोळी/तायडे (21, पाडळसा, ता.यावल) यांच्याविरुद्ध नशिराबाद पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. रविवारी आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर सोमवारी त्यांना जळगाव न्यायालयात हजर केले असता 5 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली नशिराबादचे सहा.निरीक्षक गणेश चव्हाण करीत आहेत.
सुरुवातीला फिस्कटला होता खुनाचा प्रयत्न
मयत दीपक सपकाळे या तरुणाच्या अनैतिक संबंधाबाबत विवाहितेचा पतीला कल्पना आल्यानंतर काही महिन्यांपूर्वी तरुणाचा गावातच खून करण्याचा प्लॅनिंग करण्यात आले होते मात्र काही कारणास्तव हे प्लॅनिंग फिस्कटल्याचे पोलिसांनी केलेल्या चौकशीत स्पष्ट झाले आहे.

