ईडी चौकशी : 14 दिवसानंतर माजी महसूल मंत्री खडसे चौकशीला सामोरे जाणार
मुंबई : कोरोनाची लक्षणं दिसत असल्यानं आपण सध्या ईडी कार्यालयात चौकशीला हजर राहू शकत नसल्याचं खडसें म्हणाले. भोसरी येथील भूखंड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालया (ईडी) कडून शनिवारी खडसे यांना नोटीस प्राप्त झाली होती. चौकशीत आपण सर्व सहकार्य करणार असल्याची माहिती माजी महसूल मंत्री राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी त्यावेळी माध्यमांना दिली होती.
ही तर पाचवी चौकशी
भोसरी येथील भूखंड हा पत्नी मंदाकिनी यांनी खरेदी केला असून एकत्रित कुटुंब म्हणून कदाचित माझ्या नावाने ही नोटीस आली असेल. या प्रकरणात ही पाचवी चौकशी असल्याचे माजी महसूल मंत्री खडसेंनी सांगितले होते. दरम्यान, ईडी कार्यालयात आज उपस्थित होणार होतो, पण कोरोनासदृश्य लक्षणं असल्यामुळे मी 14 दिवसांनंतर ईडी कार्यालयात हजर होईल, असे ईडी कार्यालयास कळवले होते. संबंधित कार्यालयानेही यास संमती दिली आहे. त्यामुळे, 14 दिवसांच्या विश्रांतीनंतर मी ईडी कार्यालयात जाऊन चौकशीसाठी सहकार्य करेन, असे स्पष्टीकरण एकनाथ खडसेंनी एका पत्राद्वारे प्रसिद्ध केले आहे. एकनाथ खडसेंना 28 डिसेंबरपासून सर्दी, ताप व कोरड्या खोकल्याचा त्रास जाणवू लागला आहे. त्यामुळे, त्यांनी तपासणी केली असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी 14 दिवसांच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे म्हणून ईडीच्या आजच्या चौकशीला न जाणार असल्याचे खडसेंनी सांगितले.


