राजधानी एक्स्प्रेस आता आठवड्यातन चार दिवस धावणार
प्रवाशांना दिलासा : मुंबई-दिल्ली प्रीमियम एक्स्प्रेसला प्रतिसाद
भुसावळ : मुंबई-दिल्ली दरम्यान धावणार्या राजधानी एक्स्प्रेसला मुंबईसह जळगाव आणि भोपाळ येथील प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिलयाने ही गाडी आता आठवड्यातून चार दिवस धावणार आहे. या संदर्भात प्रवाशांनी खासदार रक्षा खडसे यांच्याकडे मागणी केल्यानंतर त्यांनी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. जानेवारी महिन्यापासून मुंबई ते दिल्लीदरम्यान राजधानी एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्यानंतर ती सुरूवातीला आठवड्यातून दोन दिवस धावत होती मात्र आता ती चार दिवस धावणार असल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.
16 तासात अंतर पार
मुंबई ते दिल्ली हे अंतर 20 तासांत ही गाडी पार करीत असे मात्र, पूल-पुश तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्यानंतर हे अंतर 16 तासांवर आले. परिणामी कमी खर्चासह कमी वेळेत दिल्ली गाठणे मुंबईकरांना सहज शक्य झाले असून नाशिक, जळगाव, भोपाळ येथूनही या गाडीला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पश्चिम रेल्वेकडून नुकताच 20 कोचचा रॅक मध्य रेल्वेला उपलब्ध झाल्याने राजधानीच्या फेर्यांत वाढ होण्याचा मार्ग आता मोकळा झाला. दरम्यान, पश्चिम रेल्वेकडून मिळालेल्या रेकमध्ये पूल-पुश तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आवश्यक बदल करण्याची प्रक्रिया मध्य रेल्वेकडून केली जात असून या कामास एक आठवड्याचा कालावधी लागणार असल्याने साधारणतः पंधरा दिवसांनंतर ही गाडी आठवड्यातून चार दिवस प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे.