बिनविरोध निवडणुकीने हरणखेड ग्रामपंचायतीने निर्माण केला आदर्श


बोदवड : तालुक्यातील हरणखेड ग्रामपंचायतीने यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवडणूक जाहीर करून तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीसमोर आदर्श निर्माण केला आहे. गावकऱ्यांनी विकास काम करणाऱ्यांना प्राधान्य दिल्याने हे शक्य झाले आहे. गावात विविध विकासकामे पूर्ण असल्याने गावकरी समाधानी आहेत व ग्रामपंचायतीचा कारभार हा पारदर्शक व विकासाला प्राधान्य देणारा असल्याने ग्रामपंचायत बिनविरोध जाहीर झाली आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत हरणखेड या गावातील एकमेव गांधी कुटुंबातील महिला सरपंच समिता रुपेश गांधी यांनी पाच वर्ष सरपंच पदाची यशस्वी धुरा सांभाळली. त्यांना या काळात त्यांचे ग्रामपंचायत सदस्य असलेले पती रुपेश गांधी व इतर सदस्य व गावकरी यांच्या सहकार्याने गावात विविध विकासकामे केली आहेत व त्याचा फायदा सध्या गावकरी घेत असल्याने यंदा निवडणूक जाहीर होताच हरणखेड येथील निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गावातील माजी सरपंच समिता रुपेश गांधी व त्यांचे ग्रामपंचायत सदस्य असलेले पती रुपेश दामोदर गांधी यांनी गावकऱ्यांना विश्वासात घेऊन व संपूर्ण गावकऱ्यांनी रुपेश गांधी यांना नऊ सदस्य निवडण्याचे पूर्ण अधिकार दिले व त्यांनी सर्वसमावेशक पॅनल तयार करून फॉर्म भरून घेतले व पॅनल प्रमुख गोविंदा फिरके यांच्या मार्गदर्शनाने पॅनल बिनविरोध झाले. 29 रोजी पॅनल बिनविरोध करण्यात सिंहाचा वाटा असलेले गोविंदा फिरके यांचे हृदयविकाराने दुःखद निधन झाले त्यामुळे गड आला पण सिंह गेला ही भावना गावकऱ्यांच्या मनात आली व फिरके यांच्या पाठिंब्याने आपण गावाचा चेहरा-मोहरा बदलू शकलो, असे मत रुपेश गांधी यांनी व्यक्त केले व गावाने निवडणूक बिनविरोध करून गोविंदा फिरके यांना खरी श्रद्धांजली अर्पण केली आहे. निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे निवडणुकीसाठी होणारा अंदाजे पाच लाख रुपये पर्यंतचा खर्च वाचला आहे व आता हरणखेड ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे.

या सदस्यांची झाली बिनविरोध निवड
गावकऱ्यांनी एकत्र येत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला व त्यावर अंमलबजावणी करून नऊ सदस्य ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध जाहीर झाली. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सदस्य यात रुपेश दामोदर गांधी (ओपन), सुभाष वसंत बोरोले (ओपन), प्रफुल्ल रवींद्र वराडे (ओबीसी), देविदास हरी गवळी (पुरुष राखीव), स्वाती नरहरी वराडे (ओबीसी महिला), सुलभा सुपडा खराटे (ओपन महिला), निर्मला गोविंदा पाटील (ओपन महिला), अनिता गजानन अहिर (ओपन महिला), लताबाई रघुनाथ गवळी (राखीव महिला) यांची बिनविरोध निवड झाली.


हरणखेड गावाचा विकास झाला असा
गावाची लोकसंख्या 2500 व मतदान 1270 आहे. सन 2017 मध्ये गावाला स्मार्ट सिटी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे व लोकमत सरपंच पुरस्कारदेखील ग्रामपंचायतीने मिळवला आहे. गावात सोलर पंप बसविण्यात आले आहे त्यामुळे दररोज सोलरच्या साह्याने गावाला 70 हजार लिटर पाणी विना विजेचा वापर केल्याने मिळते त्यामुळे ग्रामपंचायतीचा विजेचा भार कमी झाला आहे व लोकांना वेळेवर पाणी मिळाल्याने त्यांची पाणी समस्या सुटली आहे तसेच गावात चौकाचौकात सोलर लॅम्प बसवण्यात आले आहे त्यामुळे गाव नेहमी प्रकाशात राहते तसेच हाय मास्ट लॅम्पमुळे गावात सर्वत्र उजेड आहे. महिलांसाठी सार्वजनिक शौचालय असून त्यांचा वापर योग्यरीत्या सुरू आहे. अल्पसंख्यांक विकास योजनेअंतर्गत ट्रीमिक्स रस्ता कॉंक्रिटीकरण अंतर्गत गावाला पाच लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. गावाच्या विकासात भर पडावी म्हणून हा रस्ता गावाच्या बाहेरील मुख्य रस्त्यावर घेण्यात आला त्यात अतिक्रमणाची समस्या होती पण गावकऱ्यांच्या सहकार्याने हा रस्ता देखील पूर्ण करण्यात आला आहे. गावात अंडरग्राउंड गटारी आहेत, दलित वस्ती अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण, दलित वस्तीत ट्रीमिक्स रस्ते कॉंक्रिटीकरण, चिखली रोडलगत सिमेंट बांध, हरणखेड राजुर ते नांदगाव रस्ता चिखली रोडवरील पाईप मोरी बांधकाम ट्रीमिक्स कॉंक्रीट रस्ते, पेव्हर ब्लॉक, सोलर लॅम्प, शेततळे, दगडी बांध खोलीकरण, दगडी बांध व सिमेंट बांध बांधकाम, इलेक्ट्रिक प्रत्येक खांबांवर एलईडी लाईट आहेत, मुक्या जनावरांसाठी गाव हाळ बांधण्यात आला आहे, व्याघ्रा नदीवर अकरा साठवण बंधारे बांधण्यात आले आहेत, महिला व पुरुषांसाठी मुतारी बांधकाम केलेले आहे, अंगणवाडीला वॉल कंपाऊंड पूर्ण आहे, पडक्या विहिरीचे बांधकाम पूर्ण केले आहे, शौचालय दुरुस्ती करण्यात आली आहे, जि.प.शाळेसाठी अँड्रॉइड एलईडी टी.व्ही. संच आहे व जाळीचे कंपाऊंड आहे , मोटार पंपाची खरेदी गावासाठी केली आहे, ग्रामपंचायतीच्या खालील भागात स्पार्टएक्स बसवली आहे, ग्रामपंचायतसमोर डिजिटल बोर्ड बसविला आहे, गावातील ग्राम निधी व नियमित कर भरणाऱ्या ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तीनशे लिटरच्या त्र्याहत्तर टाक्या भेट देण्यात आले आहेत, मातंग समाजाच्या सभागृहाला तार कंपाउंड व लोखंडी गेट बसविले आहे, गावात सिमेंट बेंच , फुल बांधकाम, NSS कॅम्पचे आयोजन, नवीन रेशन कार्ड व गरजुना धान्य देण्यात येते, गावात आरओ प्रणाली कार्यान्वित असून त्यामध्ये लोकांना पाच रुपयात 15 लिटर शुद्ध व थंड पाणी मिळते, विविध महापुरुषांचे लोखंडी गेट उभारले आहेत, सामाजिक सभागृह उभारण्यात आले आहे, उज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅस वाटप योजनेचा लाभ लाभार्थ्यांना दिला आहे, समाज मंदिर दुरुस्ती, रंगमंच यांची उभारणी, दुष्काळी परीस्थितीत वैयक्तिक टँकरने पाणी वाटप व अर्बन योजना तसेच गावातील तरुणांसाठी अद्ययावत व्यायाम शाळा उघडण्यात आली आहे, स्वर्गीय निखिल खडसे यांच्या नावाने बाल उद्यान निर्मिती करून त्यात बाल गोपाल मनसोक्त खेळण्याचा आनंद घेत आहेत तसेच गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात येतो. यासारखी विविध विकासकामे गावात असल्याने गावकरी समाधानी आहेत व ही सर्व कामे गावकऱ्यांच्या सहकार्याने व एकनाथ खडसे व रोहिणी खडसे खेवलकर, ऍड.रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाने पूर्ण झालेली आहेत .

ग्रामस्थांच्या सहकार्याने निवडणूक बिनविरोध
गोविंदा फिरके यांच्या मार्गदर्शनाने व संपूर्ण गावकऱ्यांच्या सहकार्याने बोदवड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात हरणखेड ग्रामपंचायत यशस्वी झाली आहे. गावासाठी प्रामाणिक प्रयत्न करून गावाचा चेहरा-मोहरा बदलल्याने गावकऱ्यांनी पुन्हा एकदा संधी दिली आहे. या संधीचा फायदा गावाच्या विकासासाठी व प्रगती करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू, ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, ऍड.रोहिणी खडसे व ऍड.रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाने ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला असल्याचे ग्रामपंचायत सदस्य रुपेश दामोदर गांधी म्हणाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !