तांत्रिक उत्क्रांतीनंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्यूनिकेशन क्षेत्र बदलले
प्रा.अनंत भिडे : श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यशाळा
भुसावळ : इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन अभियांत्रिकी ही सर्वात लोकप्रिय अभियांत्रिकी शाखांपैकी एक बनली आहे कारण मागील दशकातील तांत्रिक उत्क्रांतीनंतर हे क्षेत्र कमालीचे बदलले आहे. इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान हे जवळजवळ सर्व उद्योगांना आवश्यक असतांना आता आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मोबाईल फोनपासून ते दूरदर्शन, संगणक आणि अगदी उच्च श्रेणीचे प्रगत उपग्रह जे आपल्याला एक सहज जीवन जगण्यास मदत करतात. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी सध्याच्या माहिती तंत्रज्ञान क्रांतीची प्रमुख प्रेरक शक्ती आहे. हेल्थकेअर, इन्स्ट्रुमेंटेशन, ऑटोमेशन, रमोट सेन्सिंग, सिग्नल प्रोसेसिंग इत्यादी क्षेत्रातही प्रवेश केला आहे त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन अभियांत्रिकीचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना विविध उद्योगांमध्ये वाव आहे, अशी माहिती श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित इलेक्ट्रॉनिक्स 5.0 कार्यशाळेत प्रा.अनंत भिडे यांनी दिली.
यांची होती उपस्थिती
कोविड 19 नंतर इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाची व्याप्ती वाढली, या क्षेत्रातील रोजगार वाढले म्हणून विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी शाखा का निवडली पाहिजे म्हणून विद्यार्थी व पालकांना याक्षेत्राची मूलभूत माहिती कार्यशाळेत ऑनलाईन देण्यात आली. डॉ.आर.पी.सिंह, डॉ.गिरीष कुलकर्णी, प्रा.अनंत भिडे, प्रा.धिरज अग्रवाल, प्रा. सुलभा शिंदे, डॉ.नीता नेमाडे, प्रा.संतोष अग्रवाल, प्रा.दीपक खडसे, प्रा.गजानन पाटील, प्रा.निलेश निर्मल, प्रा.स्मिता चौधरी, प्रा.दीपक साकले, प्रा.धीरज पाटील उपस्थित होते.

परदेशात व्याप्ती
तंत्रज्ञानाच्या अलिकडच्या प्रगतीमुळे बहुतेक उद्योग रोबोटिक्स, ऑटोमेशन तंत्रज्ञान, स्मार्ट उर्जा प्रणाली, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) त्यांच्या प्रक्रियेत स्वीकारू लागले आहेत आणि यापैकी बरेच उद्योग आखाती देश, जर्मनी, चीन, कॅनडा इत्यादींमध्ये स्थापित आहेत म्हणूनच उच्च अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. मुख्यत: भारताबाहेरील विविध उत्पादक कंपन्यांच्या उपस्थितीमुळे कंट्रोल अॅण्ड पॉवर सिस्टीममध्ये तज्ञ असलेले इलेक्ट्रॉनिक्स अभियंता जपान, जर्मनी, अमेरिका आणि कोरीयामध्ये चांगल्या संधी शोधू शकतात असेही प्रा.भिडे म्हणाले.
सर्वोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालय निवडणे नोकरीसाठी निर्णायक : प्रा.सुलभा शिंदे
येत्या काही वर्षांत इलेक्ट्रॉनिक्स अभियंत्यांची व्याप्ती खाली येणार नाही, परंतु उद्योगांना अपेक्षित असलेल्या अभियंत्यांची कौशल्य पातळी उंचावणे म्हणजे सर्वात आव्हानात्मक असेल. त्यासाठी महाविद्यालयात सुरू असलेल्या अभ्यासक्रमासोबत अन्य तांत्रिक प्रणालीचा वापर करणे गरजेचे आहे. पदवीच्या वेळी आपल्याला सर्वोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालय निवडावे लागेल कारण करीयरच्या वाढीसाठी प्रथम नोकरी नेहमीच निर्णायक असते, असे प्रा.सुलभा शिंदे म्हणाल्या.

