दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बोलेरो ट्रकवर धडकली : चौघे तरुण ठार
हिंगणघाट : दुचाकी चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात उभ्या ट्रकवर बोलेरो आदळून झालेल्या अपघातात उमरेड तालुक्यातील हिवरा हिवरी या एकाच गावातील हे चारही तरुण ठार झाले. महाराष्ट्र दर्शनासाठी गिरड-हिंगणघाट मार्गाने हे तरुण निघाले होते. या अपघातात अन्य पाच तरुणही जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास हिंगणघाट (जि. चंद्रपूर) येथील छत्रपती शिवाजी मार्केटसमोर हा भीषण अपघात झाला.
या तरुणांचा मृत्यू
या अपघातात मोहन राजेंद्र मोंढे (22), सुरज जयवंत पाल (20), आदेश हरिभाऊ कोल्हे (17), शैलेश पंढरी गिरसावळे (26) या चार तरुणांचा मृत्यू झाला तर शुभम प्रमोद पाल (22), समीर अरुण मोंढे (17), भूषण राजेंद्र कोल्हे (24), प्रणय दिवाकर कोल्हे (17), चैतन्य प्रमोद कोल्हे (12) हे जखमी झाले. हिवरा हिवरी (ता.उमरेड) येथून सोमवारी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास गावातील एकूण 9 तरुण बोलेरो (एम.एच.40 के.आर.6482) क्रमांकाच्या बोलेरो वाहनाने हिगणघाटच्या दिशेने निघाले असता दुचाकी चालकास वाचविण्याच्या प्रयत्नात असताना बोलेरो चालक शैलेश गिरसावळे याचा वाहनावरील ताबा सुटला आणि उभ्या ट्रकला जोरदार धडक लागली.


