भुसावळ पालिकेत स्थायी समिती सदस्यांची निवड


महत्वाच्या पदांवर माजी मंत्री एकनाथराव खडसे गटाच्या नगरसेवकांना संधी : आमदारांचे समर्थक मात्र पदापासून लांब

भुसावळ : भुसावळ पालिकेत मंगळवारी विषय समिती सदस्य निवडीसाठी ऑनलाईन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, स्वच्छता वैद्यक व आरोग्य, पाणीपुरवठा व जलनिस्सारण, नियोजन आाणि विकास, महिला व बालकल्याण तसेच स्थायी समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादीत दाखल झालेल्या माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना मानणार्‍या गटातील सदस्यांना यांना झुकते माप देण्यात आले असून आमदार संजय सावकारे यांच्या समर्थकांना मात्र पदापासून लांब ठेवण्यात आल्याची जोरदार चर्चा पालिकेच्या राजकीय गोटात रंगताना या निमित्ताने दिसून आली.

सदस्यांची बिनविरोध निवड
तहसीलदार दीपक धीवरे पीठासीन अधिकारी होते. या ऑनलाइन विशेष सभेत भाजप व अपक्ष आघाडीचे गटनेते मुन्ना तेली व जनआधारचे उल्हास पगारे यांनी सदस्यांची नावे अधिकार्‍यांकडे दाखल केली. सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, स्वच्छता वैद्यक व आरोग्य, पाणीपुरवठा व जलनिस्सारण, नियोजन आाणि विकास, महिला व बालकल्याण तसेच स्थायी समितीच्या सदस्यांची सर्व नावेधीवरे यांनी ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फ्रन्सद्वारे वाचन केले. सदस्यांनी कुणाच्याही नावाबाबत आक्षेप घेतला नाही. प्रसंगी नगराध्यक्ष रमण भोळे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, सभा अधिक्षक शे.परवेज, उपमुख्याधिकारी महेंद्र कातोरे, संगणक अभियंता अनिल गवारे, धीरज बाणाईते, सभा लिपीक प्रमोद मेढे आदी उपस्थित होते.


यांना मिळू शकते सभापती पदावर संधी
मंगळवारी विषय समिती सदस्यांची निवड झाली असलीतरी अद्याप सभापती जाहीर झाले नाही मात्र राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, बांधकाम समिती सभापती पदावर गटनेते मुन्ना तेली, शिक्षण समितीवर मुकेश गुंजाळ, स्वच्छता व वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समितीवर प्रा.दिनेश राठी, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीवर किरण कोलते, नियोजन आणि विकास समितीवर पदसिध्द उपनगराध्यक्ष शे. सईदा शफी, महिला व बालकल्याण समितीवर अरुणा सुरेश सुरवाडे यांची सभापतीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे तर स्थायी समितीवर अ‍ॅड.बोधराज चौधरी, प्रतिभा पाटील व उल्हास पगारे यांची वर्णी लागणार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !