पत्रकारीतेत चांगल्या लेखणासाठी वाचन गरजेचे


प्रा.डॉ.मधू खराटे : भुसावळात उत्कृष्ट पत्रकार, छायाचित्रकारांचा पुरस्काराने सन्मान

भुसावळ : पत्रकार दिन खरे तर हा चिंतन दिन असून गतवर्षात आपण काय लिहिले, काय चुकले याचा विचार करण्याचा हा दिवस आहे. पत्रकारीतेत डिजिटल मिडीयाचा शिरकाव झाल्याने बदलत्या काळानुसार पत्रकारांनीदेखील अपडेट होणे गरजेचे असून पत्रकारीतेत चांगल्या लेखणासाठी वाचनही तितकेचे गरजेचे असल्याचे विचार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता प्रा.डॉ.मधू खराटे यांनी येथे व्यक्त केले. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून भुसावळ शहरातील समाज माध्यमात उत्कृष्ट काम करणार्‍या पत्रकारांचा ‘उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार’ व समाजकार्य करणार्‍यांचा ‘विशेष पुरस्कार’ देवून बुधवार, 6 रोजी सन्मान करण्यात आला. भुसावळ पंचायत समितीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात बुधवारी सकाळी 11 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
या कार्यक्रमास प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, डीवाएसपी सोमनाथ वाघचौरे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, ज्येष्ठ पत्रकार नंदलाल अग्रवाल, सरकारी वकील तथा भुसावळ शहर पत्रकार संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष अ‍ॅड.नितीन खरे, भुसावळ शहर पत्रकार संस्थेचे माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी यांची उपस्थिती होती.


पत्रकारीतेत शीर्षकाला महत्व
प्रा.डॉ.खराटे म्हणाले की, सरकारची निती, निर्णय चुकल्यानंतर त्यावर लगाम लावण्याचे काम पत्रकार करीत असतात मात्र डिजिटल मिडीयामुळे प्रिंट माध्यमांपुढे आव्हाने उभी राहिल्याने बदलत्या काळानुसार पत्रकारांनी अपडेट राहणे गरजेचे आहे. माध्यमांमध्ये जाहिरातींचा शिरकाव इतका प्रचंड झाला आहे की, प्रथम पानालादेखील आता महत्व राहिलेले नाही. पत्रकारीतेत शीर्षकाला महत्व असून शीर्षक हे रोचक असायला हवेत भ्रामक नव्हे, असेही ते म्हणाले. पत्रकारांनी शुद्धलेखणाचा अभ्यास करावा शिवाय चांगल्या लेखणासाठी वाचन वाढवावे, असेही त्यांनी सांगितले.

यांना मिळाला ‘उत्कृष्ट पत्रकारी’ता पुरस्कार
भुसावळ जनशक्तीचे उपसंपादक व विभागीय कार्यालयप्रमुख गणेश वाघ, ‘दैनिक देशदूत’चे उपसंपादक आशिष पाटील, ‘दैनिक लोकशाही’च्या उपसंपादक उज्वला बागुल, खान्देश लाईव्हचे पत्रकार संतोष शेलोडे यांना उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. उत्कृष्ठ छायाचित्रकार पुरस्काराने ‘लोकमत’चे श्याम गोविंदा, ‘देशदूत’चे कालु शाह, ‘दिव्य मराठी’चे कमलेश चौधरी यांचा गौरव करण्यात आला. कोरोना काळात केलेल्या कार्याची दखल घेवून उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार डॉ.विक्रांत सोनार, सामाजिक कार्यकर्ता जे.बी.कोटेचा व रघुनाथअप्पा मांडळकर यांना देवून गौरवण्यात आले.

धोका अद्याप टळलेला नाही : प्रांताधिकारी
मार्च महिन्यापासून कोरोनाच्या शिरकाव झाल्यानंतर प्रशासनासोबतच पत्रकारही कोरोना योद्धे म्हणून काम करीत आहेत. सुदैवाने कोरोनाचा कहर हळूहळू संपत असून अद्याप धोका टळला नसल्याचे प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे म्हणाले. भुसावळातील पत्रकार निर्भीड व निपक्षपणे पत्रकारीता करीत असल्याचे सांगत त्यांनी पत्रकारांचे कौतुकही केले.

समाजातील प्रश्‍न सुटण्यासाठी लेखणी तळपत रहावी : डीवायएसपी
पत्रकार व पोलिसांचा तसा नेहमीच जवळचा संबंध येतो. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील प्रश्‍न सुटण्यासाठी मूकनायक हे वृत्तपत्र काढले होते. लोकशाहीतील चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांकडे पाहिले जाते शिवाय समस्या सुटण्याची लोकांना आशा असते, असे विचार पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी व्यक्त केले. लेखणीत मोठी ताकद असलीतरी पत्रकार हा संवेदनशील मनाचा असावा व समाजातील प्रश्‍न सुटण्यासाठी सदैव लेखणी तळपत रहावी, असेही ते म्हणाले.

समस्या निश्‍चित सुटणार : मुख्याधिकारी
तीन महिन्यांपूर्वीच शहराचा पदभार घेतला असून अहोरात्र समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असून लवकरच समस्या सुटतील, अशी ग्वाही मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी दिली. गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारांची देयके अडकल्यानंतरही पत्रकारांनी मला कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बोलावल्याने त्यांचे मनापासून मी आभारी आहे व लवकरच त्यांची देयके निघतील, असे मुख्याधिकार्‍यांनी म्हणताच सभागृहात बराच वेळ हास्याचे फवारे उडाले.

यांचे यशस्वीतेसाठी परीश्रम
पत्रकार दिन कार्यक्रम यशस्वीतेसाठी भुसावळ शहर पत्रकार संस्थेचे अध्यक्ष प्रेम परदेशी व प्रोजेक्ट चेअरमन हेमंत जोशी तसेच शहर पत्रकार संस्थेच्या सर्व सदस्य व पदाधिकार्‍यांनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रकाश लोडते व राजश्री देशमुख यांनी केले. याप्रसंगी दिनेश उपाध्याय, प्रा.संजय मोरे, रीपाइं उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे आदींनीही पत्रकारांचा सन्मान केला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !