भुसावळात विशेष तिकीट निरीक्षक यांचा सन्मान
भुसावळ : भुसावळ डीआरएम कार्यालयात बुधवारी वरीष्ठ वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील यांच्या हस्ते विशेष तिकीट निरीक्षकांचा सत्कार करण्यात आला. रामकर प्रसाद राम, अनिल सोनी (खंडवा), कमलेश (बर्हाणपूर) या तिकीट निरीक्षकांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. कर्तव्याप्रती निष्ठा आणि निस्वार्थपणे त्यांनी प्रवाशांचे गाडीत सुटलेले सामान परत मिळवून देत नि: स्वार्थपणे मदत केल्याने त्याची दखल घेत हा सन्मान करण्यात आला.
निस्वार्थपणे भावनेने मदतीची दखल
उप मुख्य तिकिट निरीक्षक रामकर प्रसाद राम आणि अनिल सोनी (खंडवा) हे कर्तव्यावर असताना त्यांनी प्रसंगावधाने गाडीत सुटलेली प्रवाशाची बॅग परत केली. झाले असे की, 2 जानेवारी रोजी गोवा एक्स्प्रेसमधील कर्तव्य संपवून खंडवा येथे दोघे कर्मचारी आल्यानंतर त्याचवेळी एका प्रवाशाने आपली महत्वाचा दस्तावेज असलेली बॅग पवन एक्स्प्रेसच्या कोच क्रमांक एस- थ्री मध्ये राहून गेल्याचे कळवल्यानंतर त्यांनी रामाकर प्रसाद राम यांनी पवन एक्सप्रेसच्या ऑन ड्यूटी टीटीईला शोधून त्यांच्याशी संपर्क साधला व बर्हाणपूर येथे कार्यरत टीटीई कमलेश यांना संपूर्ण घटना सांगितली. या माहितीमुळे पवन एक्सप्रेस बर्हाणपूरला पोहोचताच कमलेश कोच क्रमांक एस-3 मधील बर्थ क्रमांक 19 मधून बॅग ताब्यात घेतली तसेच खंडवाकडे येणार्या ताप्ती गंगा एक्स्प्रेसमधून ही बॅग खंडवा येथे पाठवल्यानंतर मूळ प्रवाशाच्या ताब्यात देण्यात आली. यावेळी मंडळ वाणिज्य प्रबंधक बी.अरुण कुमार, सहाय्यक वाणिज्य प्रबंधक (टी.जा.) अनिल पाठक यावेळी उपस्थित होते.


