भुसावळात गावठी कट्टा दाखवत मागितली खंडणी


भुसावळ रेल्वे स्थानकाबाहेरील घटना : माजी नगरसेवक पूत्रासह दोघांना अटक

भुसावळ : भुसावळ रेल्वे स्थानकाबाहेरील पार्किंगमध्ये काम करणार्‍या तरुणास गावठी कट्ट्याचा धाक दाखवत मारहाण करून दर महिन्याला पाच हजार रुपये खंडणीपोटी हप्ता देण्याची मागणी केल्याप्रकरणी हंसराज खरात व अमोल श्याम खिल्लारे उर्फ चिन्नाविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर आरोपींच्या अटकेसाठी भल्या पहाटे पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत आरोपींना अटक केली.

पार्किंगमध्ये काम करणार्‍या तरुणाकडून मागितली खंडणी
भुसावळ रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागात दुचाकी पार्किंगचा मक्ता देण्यात आला असून तेथे काम करणार्‍या 22 वर्षीय तरुणाला हंसराज खरातसह अमोल श्याम खिल्लारे उर्फ चिन्ना तसेच एका अल्पवयीन संशयीताने गावठी कट्ट्याचा धाक दाखवत मारहाण करीत दर महिन्याला पाच हजार रुपये खंडणीपोटी देण्याची मागणी केली तसेच रक्कम देण्यास नकार दिल्याने खिशातील एक हजार 200 रुपयांची रोकड लुटून नेली. या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुरनं.16/2021, भादंवि 386, 387, 323, 504, 506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक अनिल मोरे, समाधान पाटील करीत आहेत.


आरोपींच्या शोधासाठी पहाटे कोम्बिंग
बाजारपेठ पोलिसांना घडलेल्या घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत यांच्यासह तीन अधिकारी, आरसीपी प्लाटून व शहर व बाजारपेठ पोलिसांनी समता नगर परीसरात कोम्बिंग ऑपरेशन राबवत दोघा आरोपींना बुधवारी पहाटे ताब्यात घेतले. बुधवारी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे उपअधीक्षक वाघचौरे म्हणाले.

आरोपी माजी नगरसेवकपूत्र
अटकेतील आरोपी हंसरात खरात हा भुसावळातील माजी नगरसेवक स्व.रवींद्र खरात यांचा मुलगा असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी शहर पोलिसात भादंवि 307 अन्वये गुन्हा दाखल असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले शिवाय आरोपी चिनाविरुद्धही भादंवि 307 अन्वये गुन्हा दाखल आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !