यावल आगाराच्या एस.टी.कर्मचार्यास 78 हजारांचा ऑनलाईन गंडा
यावल : फोन पे कंपनीतून बोलत असल्याचे सांगत भामट्याने यावल एस.टी.आगाराच्या कर्मचार्यास भामट्याने तब्बल 78 हजारांचा गंडा घातल्याने शहरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. झाले असे की, गणपती नगरातील रहिवासी तथा एस.टी.आगारातील कर्मचारी संजय रामभाऊ मेहरकूट हे घरी असताना मंगळवारी सायंकाळी त्यांच्या पत्नी माधुरी यांच्या मोबाईलवर भामट्याने कॉल करीत आपण फोन पे कंपनीतून बोलत असल्याचे सांगत मोबाईलमध्ये फोन पे खाते सुरू करण्याच्या बहाण्याने बँक खात्याचे तपशील घेत तब्बल 78 हजार 466 रुपये काढत गंडा घातला. यावल पोलिस ठाण्यात मेहरकूट यांनी धाव घेत 7029435910 या अज्ञात मोबाईल क्रमांकाच्या अज्ञात मालकाविरोधात आय.टी.अॅक्टसह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रमोद चौधरी, संजय तायडे करीत आहेत.

