96 अवैध खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर आरपीएफकडून कारवाई
रेल्वेतील दरोड्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाला कारवाईची जाग : नियमित कारवाईसाठी चार पथकांची नियुक्ती
भुसावळ : रेल्वेतील अवैध खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरुद्ध रेल्वे सुरक्षा बलाने धडक मोहिम राबवली असून आतापर्यंत 96 विके्रत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 1 जानेवारी रोजे एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी प्रवाशांना मारहाण करीत त्यांच्याकडील ऐवज लुटल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा बलाचे आयुक्त क्षितीज गुरव यांनी चार पथके स्थापन करीत त्यांना कारवाईचे आदेश दिले होते.
दरोड्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाला जाग
1 जानेवारी रोजी गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये नाशिक रोडला गाडी हळू झाल्यावर 10 अवैध विक्रेत्यांनी गाढीत चढत जळगाव स्थानक सोडल्यावर गाडीतील प्रवाशांना मारहाण करून त्यांना मारहाण करीत मौल्यवान ऐवजाची लूट सुरू केली. भुसावळ स्थानक येण्यापूर्वीच आऊटरवर आरोपी पसार झाले. भुसावळ लोहमार्ग पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींची धरपकड सुरू करण्यात आली. या गंभीर प्रकारानंतर रेल्वे सुरक्षा बलाचे आयुक्त गुरव यांनी तत्काळ अधिकार्यांची बैठक घेत अवैध विक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या तसेच विभागातील सर्वच रेल्वे स्थानकांच्या आऊटरला आरपीएफ जवानांची गस्त सक्त करण्याच्या सूचना केल्या आहेत. विभागातील नाशिक, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, अमरावती, खंडवा, बर्हाणपूर रेल्वे स्थानकांच्या दोन्ही बाजूच्या आऊटरला गस्त वाढविण्यात आली आहे

चार पथकांवर कारवाईची जवाबदारी
भुसावळ विभागातील खंडवा, बडनेरा, मनमाड आणि नाशिक रोड या मार्गावर चार विशेष पथक आयुक्त गुरव यांनी नियुक्त केले असून एका पथकात चार जवानांचा समावेश आहे. पथकाकडून दिवसभर वेगवेगळ्या गाड्यामध्ये गस्त करून कारवाई केली जात आहे तर नाशिक आणि मनमाड मार्गावर दोन पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लोहमार्ग पोलिसांना जाग येणार कधी?
रेल्वे सुरक्षा बलाकडून कारवाई केली जात असताना दुसरीकडे लोहमार्ग पोलिसांची यंत्रणा सुस्त असल्याचा आरोप सुज्ञ प्रवासी करीत आहे. अवैध विक्रेत्यांविरुद्ध धडक कारवाई करण्याचे धाडस लोहमार्ग पोलिसांनी दाखवावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. औरंगाबाद लोहमार्गचे पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांनी या संदर्भात गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

