मका उत्पादकांना दिलासा : राज्यात खरेदी केंद्र पुन्हा होणार सुरू
रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नांना यश
भुसावळ : केंद्र सरकारद्वारे महाराष्ट्र राज्यात शासनाच्या आधारभूत किंमतीवर आधारीत शासकीय मका खरेदी केंद्र सुरू असलेतरी सरकारचे अडीच लाख क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने शासनातर्फे महाराष्ट्रातील सर्व शासकीय मका खरेदी केंद्र बंद करण्याचे आदेश 18 डिसेंबर रोजी काढण्यात आले होते. मुदतीआधीच उद्दिष्ट पूर्ण होत असल्याने मका खरेदी थांबल्याने अनेक शेतकर्यांकडील धान्याची खरेदी न झाल्याने त्यांच्यात तीव्र नाराजीची भावना होती.
खासदारांकडे केल्या होत्या तक्रारी
मुळात मक्याची जवळपास महिनाभराने उशिरा सुरू केलेली खरेदी, लॉकडाऊनमुळे आलेल्या अडचणी, पोर्टल-सर्व्हर डाऊनने खरेदी केंद्रांकडून मिळत नसलेला प्रतिसाद यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात मका शिल्लक आहे. अनेक शेतकरी खरेदी केंद्रे पुन्हा सुरू होण्याची वाट पाहत होते. काही शेतकर्यांचा मका खरेदी केंद्रांवर तर काहींचा घरात भिजत आहे. खुल्या बाजारात विक्री करावी तर हमी भावाच्या तुलनेत क्विंटलमागे 500 ते 600 रुपये फटका बसत आहे. आर्थिक अडचणीतील शेतकर्यांना खरीप पिकांच्या व्यवस्थापनाबरोबर घरखर्चासाठी पैसा हवा आहे. धान्योत्पादनाबरोबर चारा तसेच पशू-पक्षी खाद्यात मक्याचा उपयोग होतो. मक्याचा उत्पादन खर्चही वाढलेला आहे. अशावेळी किमान हमीभावाचा आधार मिळावा, अशी मका उत्पादकांची अपेक्षा आहे त्यामुळे उद्दीष्ट, मुदतवाढ, प्रस्ताव यांत केंद्र-राज्य सरकारने न अडकता मका खरेदी सुरु ठेवायला हवी अशी मका उत्पादक शेतकर्यांनी खासदार रक्षा खडसे यांच्या कडे मागणी केलेली होती.

केंद्राकडून मिळाला होता सकारात्मक प्रतिसाद
खासदार रक्षा खडसे यांनी या संदर्भात ग्राहक, अन्न व सार्वजनिक वितरण
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्याशी पत्रव्यवहार केला व दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेनुसार राज्य सरकारने शासकीय मका खरेदी मुदत वाढ मिळणे बाबत केंद्राकडे प्रस्ताव सादर केलेला नाही, असे कळवले होते. राज्य सरकारने गरज भासल्यास आणि तसा प्रस्ताव त्यांच्याकडून आल्यास मका खरेदीसाठी आणखी मुदतवाढ देण्यास केंद्र सरकार तयार आहे, असे आश्वासन केंद्रीय अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी खासदारांना दिले होते.
खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नांना यश
ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकर्यांचा मका खरेदी होण्याबाबत शासकीय मका खरेदी केंद्राला मुदत वाढ मिळणेसाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून तत्काळ केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविणे बाबत संबंधितांना आदेश देण्यात यावे, अशी विनंती खासदार रक्षा खडसे यांनी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ जी यांना 21 डिसेंबर 2020 रोजी पत्र लिहून केलेली होती. त्याअनुसार राज्य शासनाने प्रस्ताव पाठवला असता केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळून मका खरेदी पुढच्या आठवड्यात पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली आहे.

