भुसावळात वकीलांकडे धाडसी घरफोडी


घर बंद असल्याची चोरट्यांना आयतीच संधी : 20 हजारांच्या रोकडसह 60 हजारांच्या ऐवजावर चोरट्यांनी मारला डल्ला

भुसावळ : जुन्या चोर्‍या-घरफोड्यांचा तपास थंडबस्त्यात असताना नव्याने होणार्‍या चोर्‍या-घरफोड्यांमुळे नागरीकांमध्ये भीती पसरली आहे. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी पुन्हा शहरातील पाटील मळा भागात चक्क वकीलाचेच घर फोडल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी घरातील टीव्हीसह 20 हजारांची रोकड व सोन्या-चांदीचे दागिने मिळून सुमारे 60 हजारांच्या ऐवजावर डल्ला मारला. विशेष म्हणजे चोरट्याने वकीलांच्या घरातून लांबवलेल्या एटीएमद्वारे रोकड काढण्याचा प्रयत्न केला मात्र पासवर्ड चुकल्याने वकीलांना मेसेज आल्याने त्यांनी तत्काळ बँकेला सूचना देत कार्ड ब्लॉक केले तर ज्या ठिकाणाहून पैसे काढण्याचा प्रयत्न झाला तेथे चोरट्यांची छबी कैद झाल्याची शक्यता असून त्या एटीएमच्या सीसीटीव्ही फुटेज आधारे चोरट्यांचा शोध लागण्याची शक्यता आहे.

बंद घराला केले टार्गेट
पाटील मळा भागातील रहिवासी अ‍ॅड. योगेश बाविस्कर हे कुटुंबासह पाळधी येथे सोमवारी, 4 जानेवारी रोजी लग्नाला गेल्याने घर बंद असल्याची चोरट्यांनी संधी साधली. शुक्रवारी सकाळी बाविस्कर यांच्या घराशेजारी राहणार्‍यांना घराचा दरवाजा उघडा दिसल्याने त्यांनी बाविस्कर यांना माहिती कळवली व पाळधी येथून बाविस्कर व त्यांचे सासरे यांनी भुसावळ गाठले. बाजारपेठ पोलिसांना माहिती कळताच पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, सहायक फौजदार तस्लीम पठाण यांच्यासह डीबी पथकातील पोलिस कर्मचारी ईश्वर भालेराव, गजानन वाघ यांच्यसह कर्मचारी यांनी धाव घेतली.


रोकडसह 60 हजारांच्या ऐवजावर डल्ला
चोरट्यांनी मुख्य दरवाजाच्या प्रवेश करण्यापूर्वी दरवाजाचा कडी कोयंडा तोडला शिवाय घरातील प्रत्येक खोलीत जात चोरट्यांनी घरातील आणि कपाटातील सामानाची फेकाफेक केली. घरातील कपाटात मुलांचे असलेले 10 हजार रूपये आणि अन्य ठिकाणी ठेवलेले 10 हजार रुपये मिळून 20 हजारांची रोकड, देव घरात ठेवलेले चांदीचे दागिणे, गणपती मूर्ती, चांदीचा मुकुट, चांदीचे नारळ, मोदक, दुर्वा, चांदीची कुयरी असा सुमारे एकूण 60 हजाराचा ऐवज चोरट्यांनी लांबवला.

श्वान पथकाने दाखवला माग
चोरट्यांच्या शोधासाठी जळगावहून ‘जंजीर’ श्‍वानाला पाचारण करण्यात आल्यानंतर हॅण्डलर निलेश झोपे, दर्शन बोरसे यांनी त्यास कपाटाच्या खाली पडलेले ड्राव्हर सुंगविल्यानंतर त्याने बाविस्कर यांच्या घराच्या कॉर्नरपर्यतचा माग दाखविला. ठसे तज्ज्ञांनाही ठसे टिपण्याचा प्रयत्न केला. सहा.पोलिस निरीक्षक व्ही.के.कांबळे, साहेबराव चौधरी यांनी ठसे घेतले. त्यांना ईश्वर भालेराव व गजानन वाघ यांनी सहकार्य केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !