छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रपुरूषांच्या जयंतीवरून रेल्वे युनियनमध्ये जुंपली


निंदणीय कृत्याचा निषेध ः सीआरएमएस ; चूक मान्य मात्र आगामी निवडणुका डोळ्यापुढे राजकारण : एनआरएमयू

भुसावळ : एनआरएमयू या रेल्वे कर्मचारी संघटनेतर्फे संचलित ईसीसी सोसायटीच्या कॅलेंडरमध्ये महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 एप्रिल रोजी साजरी होणार्‍या जयंतीचा न झालेला उल्लेख तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारी जयंती असताना कॅलेंडरवर ‘शिवाजी जयंती’ असा एकेरी उल्लेख करण्यात आल्याने सीआरएमएस संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध शुक्रवारी व्यक्त केला तर एनआरएमयू संघटनेने ही तांत्रिक चूक असल्याचे पत्रकार परीषदेत मान्य करीत सीआरएमएस संघटना राजकारण करीत असल्याचा दावा केला. दोन रेल्वे युनियनमध्ये जुंपल्याने रेल्वे कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

ही तर निंदणीय घटना : सीआरएमएस
एनआरएमयू संघटनेने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कॅलेंडरमध्ये उल्लेख केलेला नाही शिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा ‘शिवाजी जयंती’ असा एकेरी उल्लेख केल्याने ही घटना अत्यंत निंदणीय असल्याचे रेल्वे मजदूर संघ व ऑल इंडिया एस.सी./एस.टी.असोसिएशन पी.ओएच.शाखा निषेध करीत असल्याचे पीओएच शाखाध्यक्ष किशोर कोलते व ऑल इंडिया एस.एस.एस.टी.असो.चे अध्यक्ष शांताराम जाधव यांनी कळवले आहे.


छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपुरूषांविषयी आदर, चूक मान्य : एनआरएमयू
एनआरएमयू संघटनेला छत्रपती शिवाजी महाराज व सर्वच राष्ट्रपुरूषांविषयी प्रचंड आदर असून तांत्रिक चूक झाल्याचे आम्ही मान्य करतो शिवाय लागलीच आम्ही कॅलेंडरमध्ये सुधारणा केल्याचे एनआरएमयूचे अध्यक्ष पुष्पेंद्र कापडे पत्रकार परीषदेत म्हणाले. आमच्या संघटनेचा नेहमीच सामाजिक कार्यात पुढाकार राहिला असून 17 झोनपैकी 16 झोनमध्ये आम्ही आघाडीवर असून कोविड काळात तब्बल एक कोटी दोन लाखांची मदत आम्ही शासनाला केल्याचे ते म्हणाले. 2017 मध्येदेखील सीआरएमएसकडून अशाच पद्धत्तीने कॅलेंडरमध्ये चूक झाल्याचा पुरावा त्यांनी देत आगामी निवडणुका डोळ्यापुढे ठेवून राजकारण सुरू असल्याचे ते म्हणाले. एनआरएमयू कामगार भवनात झालेल्या पत्रकार परीषदेला मंडळ सचिव आर.आर.निकम, मंडळ कोषाध्यक्ष आर.आर.पांडव, रनिंग ब्राँच अध्यक्ष आर.पी.भालेराव उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !