जळगावात शॉक लागून तरुणाचा मृत्यू
जळगाव : इलेक्ट्रीक दुकानात काम करत असताना विजेचा शॉक लागल्याने श्रीकांत प्रमोद सपके (19, रा.134 मारोतीपेठ, जुने जळगाव) या तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी शहरातील गांधी मार्केटमध्ये घडली. श्रीकांत सपके याने नुकतेच आयटीआयमध्ये इलेक्ट्रीशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर काही दिवसांपूर्वी प्रशिक्षण घेण्याच्या अनुषंगाने तो गांधी मार्केटमधील निशांत इलेक्ट्रीकल्स या दुकानावर कामाला जात होता. मंगळवारी काम करत असताना श्रीकांत यास विजेचा शॉक दुपारी अडीच ते पावणे तीन वाजेच्या सुमारास शॉक लागला. दुकान मालकांसह इतरांनी श्रीकांत याला तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी आणले असता वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणीअंती तरूणास मृत घोषीत केले. श्रीकांतच्या पश्चात वडील, आई निकिता, लहान भाऊ लोकेश तसेच काका सुरेश सपके, काकू असा परीवार आहे.