बोदवडमध्ये पाणीप्रश्न गंभीर : सुरळीत पाणीपुरवठ्याची मागणी
बोदवड : शहरात पाण्याची समस्या गंभीर बनली असून नागरीकांचे पाण्यासाठी हाल होत असल्याने बोदवड पाणीपुरवठा समितीतर्फे मुख्याधिकारी यांना नुकतेच निवेदन देवून पाण्याची समस्या सोडवण्याची मागणी करण्यात आली. प्रशासनाने वेळीच दखल घेत उपायोजना करून नागरीकांना किमान पाच दिवसाआड पाणीपुरवठा करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मुख्याधिकार्यांना दिले निवेदन
निवेदनाचा आशय असा की, शहरासह परीसरात गेल्या 20 वर्षांपासून पाण्याची समस्या भेडसावत आहे. पाणी समस्येबाबत समितीने वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. यासह नियमित पेयजलची मागणी केली आहे. सद्यस्थितीत पेजजलसाठी नागरीकांना पंधरा ते वीस दिवसांची वाट पहावी लागते. याचा परीणाम नागरीकांच्या दैनंदिन जीवनावर होत असून ही समस्या गंभीर झाल्याने नागरीकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा प्रश्न लक्षात घेता नागरीकांना किमान पाच ते सहा दिवस पाणीपुरवठा करावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदन देतेवेळी अमोल देशमुख, संगीताबाई पाटील, वैभव माटे, धनराज सुतार, सुवर्णसिंग राजपूत, संतोष वारी, अमोल शिरपूरकर, सुनंदा देशमुख, शीतल देशमुख, मनोरमा जैस्वाल, कांचन शर्मा, दीपाली कुलकर्णी, अनिता अग्रवाल, संजय अग्रवाल, देवेंद्र जयस्वाल, कृष्णा जाधव विनोद अशोक तायडे, राजेश जोशी आदी उपस्थित होते.



