कांदा उत्पादकाची फसवणूक : दोघांविरुद्ध गुन्हा
यावल : तालुक्यातील किनगाव बु.॥ येथील कांदा उत्पादकाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. किनगावचे शेतकरी छगन प्रमोद चौधरी (52) यांच्याकडून किनगाव खुर्द येथील जय मातादी ट्रेडर्स किनगावचे संचालक संदीप सुधाकर कोळी व घनःश्याम सुधाकर कोळी यांनी 2020 च्या फेब्रुवारी ते मार्च 2020 या कालावधीत चौधरी यांच्या शेतात उत्पादीत केलेले सहा लाख 11 हजार 259 रुपये किंमतीचे 36 टन कांदे विकत घेतले होते शिवाय त्यापोटी दोन लाख 52 हजार रुपये रोख स्वरूपात दिले मात्र उर्वरीत रक्कम तीन लाख 63 हजार 239 रुपयांचे तीन धनादेश दिले मात्र संबंधितांच्या खात्यात रक्कम नसल्याने धनादेश अनादर (बाऊन्स) झाले. संशयीत आरोपींना विचारणा केली असता त्यांनी शेतकर्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली तसेच पैसे परत करण्यास असमर्थता दर्शवल्याने शेतकर्याने यावल पोलिसात धाव घेत उभयंतांविरुद्ध तक्रार दिली. तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे करीत आहेत.


