भुसावळ-देवळाली पॅसेंजर येत्या सात दिवसात सुरू न झाल्यास रेल रोको


चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांचा रेल्वे प्रशासनाला इशारा

चाळीसगाव : कोरोना लॉकडाऊन काळापासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, वैद्यकीय सेवेतील कर्मचारी, इतर चाकरमानी, उद्योजक, व्यापारी, विद्यार्थी हे सर्व रेल्वे पासधारक (एमएसटी) प्रवासी हे पॅसेंजर रेल्वेसेवा बंद असल्याने दुचाकी व चारचाकी गाड्यांनी चाळीसगांव ते जळगांव व चाळीसगाव ते नाशिक प्रवास करत आहेत. हा प्रवास शारीरीक व आर्थिकदृष्टया परवडणारा नसून यामुळे चाकरमान्यांना अतोनात अडचणींचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊननंतर राज्यभर लोकल व पॅसेंजर रेल्वेसेवा सुरू झालेली असताना मात्र खान्देश विभागात अशी एकही पॅसेंजर ट्रेन सुरू करण्यात आली नाही. आता रेल्वे प्रवाशी यांच्या संयमाचा अंत पाहिला जात आहे. आधीच कोराणा काळात अनेक जणांनी नोकर्‍या गमावल्या आहेत व पॅसेंजर ट्रेन सुरू न झाल्यामुळे बेरोजगारी मध्ये वाढ होत आहे. याबाबत मध्य रेल्वेचे मंडळ प्रबंधक यांना 11 ऑक्टोबर 2020 रोजी लेखी पत्र देऊन प्रवाश्यांच्या भावना पोहचविल्या होत्या मात्र आपण त्यावर अजूनपर्यंत काही कार्यवाही न केल्यामुळे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील प्रवाश्यांच्या विनंतीचा विचार करून त्यांच्या संयमाचा अंत न पाहता भुसावळ देवळाली पॅसेंजर पत्र मिळाल्याच्या दिनांकापासून येत्या 7 दिवसात सुरू न केल्यास भारतीय जनता पक्ष व रेल्वे प्रवाशी संघटनांच्या वतीने तीव्र स्वरूपात रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल व यासाठी होणार्‍या परिणामास आपण सर्वस्वी जबाबदार असाल, असा इशारा चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला आहे.

भुसावळ डीआरएम यांना दिले पत्र
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे चे मंडळ प्रबंधक यांना पत्र देऊन प्रवाश्यांच्या भावना आमदार चव्हाण यांनी मांडल्या आहेत. त्यात त्यांनी नमूद केले आहे की, सद्यस्थितीत एक्स्प्रेस रेल्वेसेवा सुरू असून त्यासाठी आरक्षण मिळत नसल्याने व महागडे तिकीट दर असल्याने ते सर्वसामान्य प्रवाश्यांना परवडणारे नाही. मागील काळात काही अपडाऊन रेल्वे प्रवाशी बंधूं ह्या खडतर रस्त्यामार्गे प्रवासामुळे अपघात होऊन मृत्यूमुखी पडले व काहीना न भूतो न भविष्योती न भरून निघणार्‍या इजा झाल्या, काहींनी आपले हातपाय यासारखे मौल्यवान अवयव गमावले. रेल्वे प्रशासनाने याची दखल न घेतल्याने आम्हाला नाईलाजाने आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागत आहे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !