फैजपूर म्युन्सीपलच्या कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापकांची मान्यता रद्द
फैजपूर : नगरपालिका संचलित म्युन्सीपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आर.एल.आगळे यांची मुख्याध्यापकपदाची मान्यता माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी एका आदेशाद्वारे रद्द केल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. म्युन्सीपल हायस्कूलचे शिक्षक आर.एल.आगळे यांना तत्कालीन शिक्षणाधिकारी यांनी 17 ऑक्टोबर 2016 च्या पत्रानुसार सेवा ज्येेष्ठतेनुसार मुख्याध्यापक पदाची कायम मान्यता दिली होती. दरम्यान, तब्बल पाच वर्षानंतर त्यांची कायम मुख्याध्यापक पदाची मान्यता 21 जानेवारी रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी जळगांव यांनी रद्द केली आहे.
गंभीर तक्रारींची दखल
या संदर्भात तत्कालीन मुख्याध्यापक किशोर तळेले यांनी शिक्षण उपसंचालक व वरीष्ठ अधिकारी यांच्याकडे शाळेतील कारभारा विषयी तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत आगळे यांची मुख्याध्यापक पदाची मान्यता रद्द करण्यात आली तसेच पालिका प्रशासनाने मुख्याध्यापक निवडीसाठी नव्याने प्रक्रिया पूर्ण करून मुख्याध्यापक पदावर पात्र कर्मचार्यांची पदोन्नतीने नियुक्त करून तसा प्रस्ताव मान्यतेसाठी पाठवावा, असे आदेशात म्हटले आहे. मुन्सीपल हायस्कुलच्या इतिहासात प्रथमच मुख्याध्यापक पदाची मान्यता रद्दची घटना घडली आहे.

न्यायालयात दाद मागणार
सेवाज्येष्ठता नुसार मुख्याध्यापक पदावर माझाच दावा असून त्या नुसारच मुख्याध्यापकपदी माझी नियुक्ती करण्यात आली होती. वरीष्ठ अधिकार्यांकडे खोट्या व दिशाभूल तक्रारी करण्यात येऊन माझी मुख्याध्यापक पदाची मान्यता रद्द करण्यात आली आहे. या निर्णयाविरुद्ध मी न्यायालयात सुद्धा दाद मागणार असल्याचे मुख्याध्यापक आर.एल.आगळे म्हणाले.


