रावेर महसुलची जानेवारी अखेर केवळ 39 टक्केच वसुली
रावेर : गतर्षी शंभर टक्के वसुली करणार्या रावेर महसूल विभागाची यावर्षी मात्र जानेवारीपर्यंत फक्त 39 टक्केच वसूली झाली आहे. यंदादेखील शंभर टक्के शासनाचा महसूल वसूल केला जाणार असल्याचा ठाम आत्मविश्वास प्रभारी तहसीलदार संजय तायडे यांनी वर्तवला. गतवर्षी रावेर महसूल विभागाने शंभर टक्के वसूल केली होती. त्यावेळी जिल्हाभरात रावेर महसूल विभागाचे कौतुकदेखील झाले होते परंतु पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून वर्षभर कोरोना व्हायरस या महामारी विरुध्द लढतांना शासनाची तिजोरीत खडखडाट झाला आहे. शिवाय तिजोरी भरण्याची संधी शासनाने महसूलच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्याकडे दिली आहे.
अवघी 39 टक्के वसुली
यंदा शंभर टक्के पेक्षा अधिक वसूली करण्याची गरज आहे. रावेर महसूल विभागाने मिळालेले उद्दीष्ट पूर्ण करून शासनाला सहकार्य करण्याची अत्यंत गरज आहे. अद्याप जानेवारी उलटला तो पर्यंत रावेर महसूल विभागाची 39 टक्केच वसूली झाली आहे.

जिल्हाधिकारी वसूलीबाबत गंभीर
रावेर महसूल विभागाची जरी जानेवारी अखेर 39 टक्केच वसूल झाली असली तरी आम्ही मार्च पर्यंत शंभर टक्के वसुली करून देणार असल्याचा येथील तहसील प्रशासनाला विश्वास आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत महसूल वसूलीबाबत गंभीर असून सर्वांना वसूली संदर्भात फिल्डवर जाऊन सक्तीच्या सूचना करताना दिसून येत आहेत.


