भुसावळ शहरासह विभागात गणरायाचे शांततेत विसर्जन


भुसावळ- ढोल-ताशांचा गजर करीत, लेझीम खेळत व मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडवत शहरासह विभागात गणरायाला निरोप देण्यात आला. भुसावळात 32 मंडळे मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाली. शहरातील जामनेर रोडवरील भारत मेडिकलजवळ गुरुवारी दुपारी 1.15 वाजता श्री विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत यांच्या उपस्थितीत मंडळाच्या पदाधिकार्‍यांचे स्वागत व शिवा मंडळाच्या श्रींची आरती केल्यानंतर श्री विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.

आमदार, नगराध्यक्ष थिरकले
सराफा बाजारातील मुख्य मशिदीजवळ आमदार संजय सावकारे व नगराध्यक्ष रमण भोळे आदींनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यांची स्वागत केले. कार्यकर्त्यांचा आग्रहाखातर दोन्ही पदाधिकारीदेखील थिरकले. यावेळी नगरसेवक मनोज बियाणी, राजीव पारीख, प्रवीण भराडीया, जे.बी.कोटेचा यांच्यासह शांतता समितीचे सदस्य व अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

तीन ठिकाणी विसर्जन
बाप्पांचे पुलाच्या त्याबाजूने यावल साईडने मोठ्या गणपतींसाठी श्री विसर्जन करण्यात आले तर राहुल नगर व महादेव घाटात घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान, गुरुवारी शहरातील बसस्थानकाचे दिवसभर आरपीडी रोडवरील डी.एस.ग्राऊंडवर स्थलांतर करण्यात आले तर जामनेर रस्त्यासह अन्य प्रमुख मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली. पोलिसांच्या आवाहनाला मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद देत गुलालाऐवजी यंदा मोठ्या प्रमाणावर फुलांची उधळण केली.


कॉपी करू नका.