भुसावळ रनर्सचे प्रवीण फालक व डॉ.तुषार पाटलांनी पूर्ण केली अवघड लडाख मॅरेथॉन
भुसावळ : रविवार, 8 सप्टेंबर रोजी लद्दाख येथील लेह शहरात ‘लदाख मॅरेथॉनचे’ आयोजन करण्यात आले. समुद्र सपाटीपासून साधारणत: 11 हजार 70 फूट उंचीवर या स्पर्धेचे ठिकाण असून जगातील सर्वाधिक अवघड मॅरेथॉन मानली जाते मात्र संपूर्ण खान्देशातून भुसावळ स्पोर्टस अॅण्ड रनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. प्रवीण फालक व शहरातील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. तुषार पाटील यांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवत इतिहास रचला. मॅरेथॉन 7 किमी (फन रन), 21 किमी (अर्ध मॅरेथॉन) व 42 किमी (पूर्ण मॅरेथॉन) अशा तीन श्रेणींमध्ये स्पर्धा झालीतर असंख्य युरोपियन, अमेरीकन, आफ्रिकन व आशियायी देशातील धावपटूंनी सहभाग नोंदवला मात्र 42 किमीच्या अत्यंत आव्हानात्मक श्रेणीत केवळ 400 स्पर्धक सहभागी झाले.
भुसावळात खेळाडूंचे स्वागत
दोघा खेळाडूंसोबतच दीपेश परदेशी यांनीदेखील 21 किमी मॅरेथॉन श्रेणीत यशस्वी सहभाग नोंदवला तर डॉतुषार पाटील व डॉ.चारुलता पाटील यांचे चिरंजीव सिद्धेश पाटील (15) यांनीदेखील या अवघड स्पर्धेत सात किमी फन रन श्रेणीत यशस्वी सहभाग नोंदवला. मंगळवार, 10 सप्टेंबर रोजी गोवा एक्सप्रेसने भुसावळात दाखल झालेल्या धावपटूंचे भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी अतिशय उत्साहात स्वागत केले.
यांची होती उपस्थिती
रेल्वेतर्फे स्टेशन प्रबंधक मनोज श्रीवास्तव, उपप्रबंधक सुधीर देशपांडे, अधीक्षक अंसारी मोईन अहमद यांनी डॉ. तुषार पाटील, प्रवीण फालक, दीपेश परदेशी, सिद्धेश पाटील या धावपटूंचे पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर आयएमएतर्फे डॉ.संजय नहेते व डॉ.चारुलता पाटील यांनी स्वागत केले. त्यानंतर शहरातील नाहाटा महाविद्यालयातर्फे प्रा.स्वाती फालक व स्नेहल चौधरी यांनी स्वागत केले. भुसावळ स्पोर्ट अॅण्ड रनर असोसिएशनच्या उपाध्यक्षा डॉ.नीलिमा नहेते, प्रवीण पाटील, प्रवीण वारके, रणजीत खरारे, ब्रिजेश लाहोटी, राजेंद्र बोरसे, प्रमोदकुमार शुक्ला, मीना नेरकर, दीपेश कुमार सोनार, बिट्टू कुमार, संस्कार पाटील, टीना अटवाल व कशिश या सदस्यांनी स्वागत करीत स्थितांचे आभार मानले. याप्रसंगी संतोष गवले, विकास पाटील, डॉ.मिलिंद कोल्हे, डॉ.आर.एम.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.