अमळनेर पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांची उचलबांगडी


कर्तव्यात कसुरीचा ठपका : दिलीप भागवत यांच्याकडे तूर्त पदभार

अमळनेर : उपमुख्याधिकार्‍यांनी दिलेली तक्रार दाखल करून न घेतल्याप्रकरणी अमळनेरचे पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांना जिल्हा पोलिस अधीक्षकांनी नियंत्रण कक्षात जमा केले असून तूर्त पदभार पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. अमळनेर शहरातील बेकायदेशीर फलक काढण्यावरून उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड आणि जैन समाजाच्या लोकांमध्ये वाद झाले होते. जैन समाजबांधवांनी प्रांत, तहसील व पोलिस स्टेशनला मोर्चा काढून उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांच्यासह तीन कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल केला होता. याचवेळी उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनाही धक्काबुक्की, मारहाण व शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले होते. मात्र गायकवाड हे एक वरीष्ठ अधिकारी असतानाही पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांनी गुन्हा दाखल केला नव्हता.

अखेर उपमुख्याधिकारी परतले
या प्रकरणी गायकवाड यांनी आयजी प्रतापराव दिघावकर, अपर पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली. तरीही पोलिस निरीक्षक मोरे यांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. न्याय मिळण्याची अपेक्षाच संपल्याने संदीप गायकवाड यांनी फेसबुकवर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा इशारा देत बेपत्ता झाले होते. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने हरवल्याची नोंद केली होती. शुक्रवारी मध्यरात्री गायकवाड यांच्या पत्नीने त्यांना विनंती करीत धीर दिल्यावरून ते अमळनेरात शनिवारी सुखरूप परतले होते. दोन दिवसांपासून त्यांनी काहीही जेवण न केल्याने अशक्तपणा आल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

निरीक्षक मोरे यांची उचलबांगडी
अमळनेर शहरातील प्रकरण हाताबाहेर गेल्याने खुद्द पोलिस अधीक्षक मुंढे यांना अमळनेरात येऊन तळ ठोकावा लागाला. तसेच पोलिस विभागाचीही मोठी बदनामी झाल्याने जनहित व कामात कसुर केल्याचा ठपका ठेवत पोलिस अधीक्षकांनी 19 रोजी निरीक्षक मोरे यांच्या बदलीचे तडकाफडकी आदेश काढून त्यांना नियंत्रण कक्षात जमा केले आहे तर नियंत्रण कक्षातील दिलीप भागवत यांच्याकडे तूर्त अमळनेरचा पदभार सोपवण्याबाबत 19 रोजी आदेश काढले आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !