बनावट दारूचा मिनी कारखाना उद्ध्वस्त : आठ लाखांचा मुद्देमाल जप्त


दोन आरोपी पसार तर दोघांना अटक : थाळनेर पोलिसांची धडक कारवाई

शिरपूर : तालुक्यातील शिरपूर-चोपडा रस्त्यावरील सावेर शिवारात एका शेतात थाळनेर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकून स्पिरीटापासून बनावट दारूचा मिनी कारखाना उद्ध्वस्त करीत सुमारे आठ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत थाळनेर पोलिसांनी गुजरात राज्यातील एक कारसह दोन कार ताब्यात घेतल्या आहेत. संशयीत चार आरोपींमधून दोघांना अटक केली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
तालुक्यातील शिरपूर-चोपडा रस्त्यावरील सावेर गावाच्या शिवारात भिका गंगाराम भील यांच्या शेतात स्पिरीटद्वारे बनावट दारू बनवून गुजरात राज्यातील दारू तस्करांना विक्री करण्यात येत असून गुजरातमधील काही तस्कर दारूसाठा घेऊन जाणार असल्याची गोपनीय माहिती थाळनेर पोलीस ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे यांना मिळाल्यावरून पथकासह तात्काळ घटनास्थळी 22 फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास छापा टाकला. या छाप्यात स्पिरीट साठा, बनावट विदेशी मद्य साठा व बनावट दारू बनविण्याचे साहित्य व (एम.एच. 02.1413) क्रमांकाची स्वीप्ट डिझायनर व (जी.जे.बी.3679) क्रमांकाची मारुती सुझुकी अल्टो अशा दोन कार व चार संशयीत घटनास्थळी आढळून आले.पोलिसांना पाहून दोन संशयित पसार झाले असून दोन जणांना ताब्यात घेत घटनास्थळावरून सात लाख 86 हजार 250 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी थाळनेर पोलीस ठाण्यात संशयित बबलू सोनू मोरे (24, रा.भगतसिंग नगर, शिरपूर), गोरख रामजी भरवाड (40, रा.सावेर, ता.शिरपूर), हरेश टपूभाई पटगिरी (42, रा.रोजमाळ, ता.गढडा, जिल्हा, बोटाद, गुजरात), मानसिंग मनजी भाई कणसागरा (24, रा.सुरई, तालुका चोटीला, जिल्हा सुरेन्द्रनगर, गुजराथ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून बबलू सोनू मोरे (शिरपूर) व हरेश टपूभाई पटगिरी (गुजरात) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली थाळनेर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे,पीएसआय नवनाथ रसाळ, सिराज खाटीक, कृष्णा आत्माराम पावरा, मालचे, राहुल बैसाने यांच्या पथकाने केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !