भुसावळात महिलेवर बलात्कार : आरोपीला पाच दिवसांची कोठडी


लाल रंगाची दुचाकी व पीडीतेने सांगितलेल्या वर्णनावरील स्केच ठरले तपासातील ‘दुवा’ : पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची पत्रकार परीषदेत माहिती.

भुसावळ : मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील रहिमपुरा येथील 35 वर्षीय महिलेवर सोमवारी रात्री अज्ञात तरुणाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. अतिशय गुंतागुंतीचा असलेल्या गुन्ह्यात कुठलाही सबळ पुरावा नसताना केवळ पीडीतेने सांगितलेले लाल रंगाच्या दुचाकीचे वर्णन व पीडीतेने सांगितल्यानंतर आरोपीचे बनवलेले स्केच या आधारे पोलिसांनी आरोपीला हुडकून काढल्याची माहिती भुसावळ विभागाचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व सहा.पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी शनिवारी दुपारी चार वाजता पत्रकार परीषदेत दिली. उपअधीक्षक वाघचौरे यांनी आपल्या अतिशय अभ्यासपूर्ण पद्धत्तीने गुन्ह्याचे विश्‍लेषण करीत या गुन्ह्याचा छडा लावून पोलिस दलाची मान उंचावल्याने त्यांच्यासह पोलिस विभागावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भावेश कांतीलाल दंडगव्हाळ (28, शिव कॉलनी, रेल्वे दुनिया परीसर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्यास न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

निर्जन जागी नराधमाचा अत्याचार
खरगोन जिल्ह्यातील रहिमपुरा येथील 35 वर्षीय महिलेचे भुसावळातील एका महिलेशी नाजूक विषयावर वाद सुरू असल्याने त्याबाबत जाब विचारण्यासाठी ही महिला सोमवारी दुपारी चार वाजता भुसावळात आल्यानंतर त्या महिलेच्या घरी पोहोचली. नाजूक विषयावरील वाद वाढत गेल्याने तो बाजारपेठ पोलिस ठाण्यात पोहोचला. पोलिसांनी वादाचे मूळ कारण शोध उभयंतांमधील वादाची दरी मिटवत उभयंतांना समज दिली. वाद झालेल्या महिलेने रात्रभर आपल्या घरी राहण्याची विनंती केली असतानाच 35 वर्षीय महिलेला मुलाचा फोन आल्यानंतर ती पोलिस ठाण्याबाहेर पडली व दगडी पुलाकडे निघाली असतानाच 25 ते 30 वर्षीय तरुणाने भांडण झालेल्या महिलेने घरी बोलावल्याचे सांगत दुचाकीवर बसवून राष्ट्रीय महामार्गावरील वाय पॉईंटजवळील वेदांत कोल्ड्रींग दुकानाच्या पाठीमागील भुराशेट मारवाडी यांच्या शेतात 35 वर्षीय महिलेवर अत्याचार केला. तत्पूर्वी महिलेला आपल्यावरील संकटाची चाहुल लागल्याने तिने दुचाकीवरून उडी टाकली मात्र आरोपीने तिचा पाठलाग करीत तिला मारहाण करीत तब्बल दोन वेळा अत्याचार केला. अत्याचारानंतर आरोपीने पीडीतेचा मोबाईल फोडला शिवाय पीडीतेचे कपडेही जाळले शिवाय पीडीतेच्या अंगावर दगड टाकून तिला मारण्याचा प्रत्यन केला मात्र पीडीतेने वार चुकवला. सोमवार, 22 रोजी रात्री 9.30 ते 11.30 दरम्यान ही घटना घडली.

दुचाकी व स्केचमुळे पटली आरोपीची ओळख
अत्याचारानंतर भेदरलेल्या अवस्थेत पीडीता एका पंपावर पोहोचली व तेथून पोलिसांना माहिती कळवण्यात आल्यानंतर पोलिसांनी तिला सुरक्षीतरीत्या बाजारपेठ पोलिस ठाणे गाठले. महिला सहा.निरीक्षक रुपाली चव्हाण यांनी पीडीतेची तक्रार नोंदवून घेत नराधमाचे वर्णन विचारले शिवाय गुन्ह्यात आरोपीजवळ लाल रंगाची दुचाकी असल्याची माहिती पुढे आली शिवाय पीडीतेने आरोपीचे वर्णन सांगितल्यानंतर पोलिसांनी जिल्हाभरातील सर्व लाल रंगाच्या दुचाकींची पडताळणी केली शिवाय आरोपीने पीडीतेला ज्या मार्गाने नेले त्या सर्व मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपीचा शोध लागला.

तिड्यातून अटक : आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार
गुन्हा निष्पन्न होण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह अन्य संशयीतांची बारकाईने चौकशी करण्यात आली मात्र स्केचमुळे आरोपीची ओळख पटली. दंगलीसह भादंवि 307 च्या गुन्ह्यात शहर पोलिस ठाण्यात आरोपी भावेश कांतीलाल दंडगव्हाळ (28, शिव कॉलनी, रेल्वे दुनिया परीसर, भुसावळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होता शिवाय पीडीतेने सांगितलेल्या वर्णनाचे स्केच आरोपीशी मिळते-जुळते असल्याने त्याचा शोध घेतल्यानंतर तो घरी नसल्याने पोलिसांचा संशय बळावला. आरोपीच्या वडिलांनाही चौकशीकामी बोलावण्यात आले व पथकाला आरोपी तिड्या येथे लपून असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास शुक्रवारी ताब्यात घेण्यात आले.

यांनी उघडकीस आणला आव्हानात्मक गुन्हा
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, सहा.अधीक्षक अर्चित चांडक, सहा.निरीक्षक अनिल मोरे, सहा.निरीक्षक मंगेश गोंटला, शहर वाहतूक शाखेचे सहा.निरीक्षक हनुमंत गायकवाड, शहरचे सहा.निरीक्षक संदीप दुनगहू, तालुक्याचे सहा.निरीक्षक रुपाली चव्हाण, गुन्हे शोध पथकाचे हवालदार जितू पाटील, अनिल पाटील, अयाज सैय्यद, रवींद्र बिर्‍हाडे, किशोर महाजन, उमाकांत पाटील, रमण सुरळकर, दीपक पाटील, गीता कश्यप, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्‍वर भालेराव, दिनेश कापडणे, योगेश माळी, परेश बिर्‍हाडे, जीवन कापडे, सचिन चौधरी, प्रशांत सोनार, आशा बावस्कर यांनी हा गुन्हा उघडकीस आला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !