लग्नाच्या आमिषाने अत्याचार : सर्वोच्च न्यायालयाने संशयीत आरोपीला पीडीतेसोबत विवाह करण्याबाबत केली विचारणा !
नवी दिल्ली : लग्नाचे आमिष देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला खंडपीठाने अंतरीम जामीन नाकारल्यानंतर सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली मात्र सोमवारी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे यांनी आरोपीला तिच्याशी लग्न करणार का? अशी विचारणा केली व आज देशभरातील माध्यमांचे या सुनावणीकडे लक्ष लागून होते.
आरोपी म्हणाला मी आधीच विवाहित
वीज कंपनीत नोकरीस असलेल्या 24 वर्षीय आरोपीने 2019 मध्ये अल्पवयीन बालिकेशी लग्न करण्याचे वचत देत संबंध निर्माण करून तिच्यावर अत्याचार केला होता. त्यावेळी आरोपीच्या आईने या मुलीला सज्ञान झाली की तिचे तुझ्याशी लग्न लावून देईन तसेच तिला मी सून म्हणून स्वीकारेन, पण माझ्या मुलाविरुद्ध पोलिसांत तक्रार करू नका, असे 500 रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर लिहून दिले होते. परंतु लग्न न झाल्यामुळे पीडिता कोर्टात पोहोचली. खंडपीठाने अंतरीम जामीन फेटाळल्याप्रकरणी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. सोमवारी सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी आरोपीला ‘तू तिच्यासोबत लग्न करणार का?’ अशी विचारणा केली असता आरोपीच्या वकिलाने यासंबंधी सूचना घेऊ, असं उत्तर दिलं. यावर सरन्यायाधीश म्हणाले की, याचा विचार मुलीचा छळ आणि बलात्कार करण्याआधी व्हायला हवा होता. आरोपी सरकारी कर्मचारी आहे हे त्याला माहिती होतं. आम्ही तुला लग्नासाठी जबरदस्ती करत नाही आहोत. पण जर करण्याची तयारी असेल तर आम्हाला कळवावं. नाही तर आम्ही तुझ्यावर जबरदस्ती करत आहोत असं सांगशील. त्यावर आरोपीने आपण विवाहित असल्याचे कारण दिले. आरोपीचा हा नकार ऐकल्यावर सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या निकालात हस्तक्षेप करण्यास आपण उत्सूक नसल्याचे सांगून याचिका मागे घेण्याची सूचना केली. त्यानुसार याचिका मागे घेण्यात आली. मात्र आरोपीला सक्षम न्यायालयाकडे नियमित जामिनासाठी अर्ज करता यावा यासाठी त्याच्या संभाव्य अटकेस आठ आठवडे स्थगिती देण्यात आली.

