कोविड सेंटरमध्ये महिलेचा विनयभंग : आरोपी डॉक्टर बडतर्फ
औरंगाबाद : महापालिकेच्या पद्मपुरा येथील कोविड केअर सेंटरमध्ये मंगळवारी रात्री दोन वाजता आरोपी डॉक्टराने पॉझीटीव्ह आलेल्या महिला रुग्णाचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी आरोपी कंत्राटी डॉक्टरला गुरुवारी महापालिका प्रशासनाने तडकाफडकी बडतर्फ केले आहे. बुधवारी महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी आरोग्य अधिकारी मनीषा भोंडवे यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले. भोंडवे यांनी गुरुवारी सकाळी चौकशी अहवाल प्रशासक यांना सादर केला. अहवालात पदमपुरा येथे आयुष डॉक्टर संदीप पंजरकर हा सीसीटीव्हीत महिलेशी अंलगट करताना अनेकदा दिसून आला. महिलेने दिलेल्या माहितीवरून आणि परीस्थितीजन्य पुराव्यावरून चौकशी अधिकारी यांनी डॉक्टर पंजरकर दोषी असल्याचे अहवालात नमूद केले. या अहवालावरून प्रशासक पांडेय यांनी तडकाफडकी डॉक्टर पंजरकरला बडतर्फ केले.
विधी मंडळात उपस्थित झाला प्रश्न
महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये महिलेवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याचे प्रकरण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित डॉक्टराला महापालिका प्रशासनाने निलंबित केल्याचे उत्तर दिले. त्यानंतर आ.अतुल सावे यांनी महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ प्रशासनाबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.







