बसमधून प्रवास करणार्या विवाहितेचे अडीच लाखांचे दागिने लांबवले
जळगाव : शहरातील नवीन बसस्थानकातून भोकर येथे जाण्यासाठी निघालेल्या पूनम श्रावण सोनवणे (28, रा.अहमदाबाद) या विवाहितेचे जळगाव ते विदगाव प्रवासात अज्ञात चोरट्याने सहा तोळे वजनाचे व अडीच लाख रुपयाचे किंमतीचे दागिने चोरट्यांनी लांबवल्याची घटना गुरुवारी दुपारी दोन वाजता घडली.
लग्नाला आल्यानंतर लांबवले दागिणे
पूनम श्रावण सोनवणे व त्यांच्या आई इंदूबाई दोन्ही गुरुवारी सकाळी अहमदाबाद येथून हावडा मेलने जळगावात आल्या. तालुक्यातील भोकर येथे त्यांच्या नातेवाईकांकडे असलेल्या लग्न समारंभासाठी दोघी जाण्यासाठी जळगाव शहरातील नवीन बसस्थानकात पोहोचल्या. भोकर येथे जाण्यासाठी दुपारी एक वाजता त्या नवीन बसस्थानकातून जळगाव चोपडा बसमध्ये बसल्या. बसमध्ये प्रचंड गर्दी असल्यामळे त्यांना जागा मिळाली नाही.








मदत करणार्याने ऐवज लांबविल्याचा संशय
काही वेळाने एका प्रवाशाने मदत करण्याचा बहाणा करुन वाहकाच्या सीटमागे एक जागा पूनम यांना बसण्यासाठी दिली. यावेळी त्यांनी बॅग मागच्या सीटखाली ठेवली होती. त्यांना मदत करणारा प्रवासी बॅगवर लक्ष ठेऊन होता. दरम्यान, आपण ज्या बसमध्ये बसलो आहे, ती भोकरकडून जात नसल्याचे लक्षात आल्यावर पूनम व त्यांची आई विदगाव येथे उतरल्या. यावेळी जागा देणार्या प्रवाशानेच पूनम यांना उतरतांना बॅग दिली. खाली उतरल्यावर बस निघून गेल्यानंतर पूनम यांना बॅग कापली असून त्यातील साडेचार तोळ्यांची एक पोत व एक दीड तोळ्याची पोत असे एकूण सहा तोळे दागिणे व अडीच रुपयांची रोकड गायब असल्याचे दिसून आले. यानंतर पूनम यांनी तक्रारीसाठी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठले. पूनम सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला.