पत्रकार बाळ बोठेच्या खिशात सापडली सुसाईड नोट
अहमदनगर : हत्याकांड प्रकरणी हैद्राबाद येथून पत्रकार बाळ जगन्नाथ बोठे यास अटक करण्यात आली. यावेळी पोलिसांना बोठेच्या खिशाला सुसाईड नोट सापडल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बाळ जगन्नाथ बोठे असल्याचा आरोप आहे. दरम्यान, रेखा जरे यांची 30 नोव्हेंबरला नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट (ता.पारनेर) परीसरात गळा चिरून हत्या झाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती.
खिशात सापडली सुसाईड नोट
अडीच महिन्यांनी नगर पोलिसांनी शनिवारी हैदराबाद येथून बाळ बोठेला अटक केली. यावेळी हैदराबाद येथे घेतलेल्या झडतीमध्ये पोलिसांना सुसाईड नोट सापडली. सुसाईड केल्यानंतर माझ्या कुटुंबियांना संपर्क करा असा उल्लेख या नोटमध्ये आहे. आरोपीला बोठेला न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडीची मागणी सरकारी वकील सिध्दार्थ बागले यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने बोठेला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. बोठेसह त्याला मदत करणारे आंध्र प्रदेशातील जनार्दन चंद्राप्पा, राजशेखर चाकाली, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहमान अब्दुल आरीफ व महेश वसंतराव तनपुरे (रा.नवलेनगर, सावेडी, अहमदनगर) यांनाही अटक केल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. पी.अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी (रा.हैदराबाद) ही महिला आरोपी फरार आहे.







