प्रेमासाठी वाट्टेल ते ! : विवाहित महिलेने सोबत येण्यासाठी त्याने कापल्या हाताच्या नसा
नागपूर : सोशल मिडीयावरून 35 वर्षीय विवाहित महिलेशी सलगी वाढल्यानंतर टॅक्सी ड्रायव्हर असलेला तरुण तिच्या प्रेमात आकंठ बुडाला व दोघांचे सूत जुळल्यानंतर जुलै 2020 रोजी त्याने विवाहितेला पळवून जळगावात आणत सुमारे सात महिने संसारही थाटला. दुसरीकडे पतीने विवाहिता हरवल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी जळगाव गाठले मात्र विवाहितेने स्वमर्जीने आल्याचे सांगत तरुणासोबत राहण्याची जवाब दिल्याने पोलिस आल्या पावली परतले. सुमारे महिनाभरापूर्वी दोघांमध्ये खटके उडाल्याने महिला पतीकडे परतली. इकडे विवाहितेच्या विरहात वेडापिसा झालेल्या तरुणाने नागपूर गाठले व विवाहितेला सोबत येण्यासाठी आग्रह धरला मात्र विवाहितेने नकार दिल्याने संतापाच्या भरात तरुणाने हाताच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. नागपुरातील बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी घडल्यानंतर विवाहितेने पोलिसांना माहिती कळवली.