देवेंद्र फडणवीसांच्या रुपाने स्थिर सरकारची संधी


नाशिकमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी : महाजनादेश यात्रेचा समारोप

नाशिक : आता महाराष्ट्राला फडणवीस सरकारच्या रुपाने स्थिर राजकारण करण्याची एक संधी आहे. ही संधी महाराष्ट्रातील जनतेते सोडू नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. या सभेत नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत केली. यानंतर त्यांनी उदयनराजे भोसले यांचा आवर्जून उल्लेख केला. छत्रपती उदयनराजेंनी माझ्या डोक्यावर छत्र ठेवले. हा माझा सन्मानही आहे आणि एकप्रकारची जबाबदारीही आहे, असे मोदींनी सांगितले. भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपप्रसंगी गुरुवारी नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘चला पुन्हा आणुया आपले सरकार’ अशी घोषणा देत महाराष्ट्रातील जनतेला साद घातली.

कलम 370 बाबत विरोधकांची भूमिका चुकीची
मोदींनी काश्मीरमधील अनुच्छेद 370 रद्द झाल्यानंतर विरोधकांकडून सुरु झालेल्या राजकारणावरही पंतप्रधानांनी ताशेरे ओढले. अनुच्छेद 370 रद्द करण्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रत्येक भारतीय प्रयत्नशील आहे. मात्र, विरोधक यामध्येही राजकारण करू पाहत आहेत. या सगळ्यात काँग्रेसची होणारी राजकीय अडचण मी समजू शकतो. मात्र, शरद पवारांसारखा अनुभवी नेताही चुकीची भूमिका घेतो याचे मला दु:ख वाटते. विरोधकांनी आमच्यावर जरुर टीका करावी. पण यानिमित्ताने दहशतवादाला पोसणार्‍यांना अपप्रचार करण्याची संधी देऊ नये, असे आवाहन मोदींनी केले.

प्रभू श्रीरामासाठी देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराविषयीच्या मुद्द्यालाही अनपेक्षितपणे हात घातला. त्यांनी म्हटले की, गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून काही वाचाळ लोक राम मंदिराविषयी बेताल वक्तव्ये करत आहेत मात्र हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मग असे असताना हे वाचाळवीर अखंड बडबड का करत आहेत? असा सवाल मोदींनी उपस्थित केला. तसेच आपल्या देशाचे संविधान आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास असला पाहिजे. त्यामुळे मी वाचाळवीरांना हात जोडून विनंती करतो की, किमान श्रीरामासाठी तरी देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा. दरम्यान, मोदींच्या या टीकेचा रोख नेमका कोणाच्या दिशेने होता, हा प्रश्न आता राजकीय वर्तुळाला पडला आहे.


कॉपी करू नका.