मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील माजी मंत्री खडसेंना भाषणाची संधी मिळालीच नाही


नाशिक – महाजनादेश यात्रेच्या समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकमध्ये हजेरी लावली तर मोदींच्या सभेनिमित्त पहिल्या रांगेत बसलेले ज्येष्ठ नेते तथा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील माजी एकनाथराव खडसे यांना भाषण करण्याची संधी न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये काहीशी नाराजी पसरली. दरम्यान, खडसे यांचे जळगाव जिल्ह्यातील व पक्षातीलही प्रतिस्पर्धी म्हणवणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा या सभेतील बोलबाला मात्र लक्षवेधी ठरला.

ज्येष्ठ असूनही मिळाली नाही संधी
पंकजा मुंडे, गिरीश महाजन, यांच्यासारख्या खडसेंना ज्युनिअर असलेल्या नेत्यांनी भाषण केली मात्र माजी मंत्री खडसे मात्र भाषणापासून वंचितच राहिले.माजी मंत्री एकनाथराव खडसे पक्षात राहून पक्ष नेत्यांना वेळोवेळी खडे बोल सूनावण्यासाठी ओळखले जातात. मंत्री पदावरून दूर व्हावे लागल्यानंतर ते अधिकच कटू बोलताना दिसले त्यामुळे नाशकात मोदी यांच्या विजय संकल्प सभेत ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. पण तशी संधीच त्यांना मिळाली नाही. केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्याचे अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, माजी केंद्रीय मंत्री डॉ.सुभाष भामरे, दिंडोरीच्या खासदार डॉ.भारती पवार यांची भाषणे झाल्यानंतर खडसेंचा नंबर कधी येईल याची उपस्थितांना उत्सुकता लागून असलीतरी खडसे यांना भाषणाची संधी मात्र मिळाली नाही.


कॉपी करू नका.