भुसावळात ऑक्सीजन सिलिंडरचा पुरवठा करणार्‍या ठेकेदारास अखेर मिळाला धनादेश


भुसावळ : शहरातील ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून ऑक्सीजन सिलिंडरचा पुरवठा करणार्‍या ठेकेदाराला शासनाकडून थकीत पेमेंट मिळत नसल्याने त्या संदर्भात होणारी गैरसोय लक्षात घेता शिवसेना पदाधिकार्‍यांनी बुधवारी जळगावच्या अजिंठा रेस्ट हाऊसमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेत होती. पदाधिकार्‍यांच्या तक्रारीची दखल घेत पालकमंत्र्यांनी तातडीने डीन नागोराव चव्हाण यांच्याशी संपर्क साधून भुसावळात ऑक्सिजनचा पुरवठा करणार्‍या ठेकेदाराचे तातडीने थकीत बिल अदा करण्याच्या सूचना केल्या होत्या. पालकमंत्र्यांच्या दणक्यानंतर शुक्रवारी अखेर संबंधीत ठेकेदाराला थकीत बिलाचा धनादेश मिळाल्याचे अ‍ॅड.निर्मल दायमा यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांच्या आदेशाची दखल
पालकमंत्री यांनी दिलेल्या आदेशानंतर तातडीने ठेकेदाराचेे रखडलेले दोन लाख 13 हजार 848 रुपयांचे बिल अदा करण्यासंदर्भात हालचाली सुरू करण्यात आल्या. ट्रामा केअर सेंटरला तारा एजन्सीचे तन्मय बेंडाळे यांच्याकडून ऑक्सीजनचा पुरवठा होत असलातरी त्यांचे बिल अडकले होते. या संदर्भात शिवसेना पदाधिकार्‍यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. शुक्रवारी संबंधित ठेकेदाराला धनादेश मिळाल्याचे अ‍ॅड.निर्मल दायमा यांनी सांगितले. दरम्यान, शिवसेनेचे अ‍ॅड.निर्मल दायमा, शहर प्रमुख बबलू बर्‍हाटे, माजी नगरसेवक दीपक धांडे, माजी नगरसेवक नरेंद्र लोखंडे आदींनी केलेला पाठपुरावा अखेर यशस्वी ठरला आहे.




सुरळीत ऑक्सिजन पुरवठ्याची अपेक्षा
दरम्यान, बिलाअभावी मध्यंतरी ठेकेदाराने रुग्णालयाला ऑक्सिजनचा पुरवठा बंद केल्याने रुग्णांची मोठी गैरसोय झाली होती. या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरीकातून मोठी नाराजी व्यक्त होती. दुदैर्वाने अप्रिय घटना घडल्यास जवाबदार कोण ? असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित झाला होता. प्रशासन व ठेकेदाराच्या वादात रुग्णांच्या जीवाशी खेळू नये, असेही बोलले जात आहे. दरम्यान, ठेकेदाराला धनादेश मिळण्याबाबत भाजपा वैद्यकीय आघाडी उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ.नि.तु.पाटील यांनीदेखील वरीष्ठ स्तरावर तक्रार करून आवाज उचलला होता. बुधवारी देखील त्यांनी या संदर्भात चव्हाण यांच्याशी चर्चा केली व ठेकेदाराशी संवाद साधून दिला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !