भुसावळात मुसळधार : हतनूरचे आठ दरवाजे उघडे
भुसावळ- शहरात गुरुवारी सायंकाळी पावसाचा शिडकावा झाल्यानंतर रात्री साडेसात वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शहरातील रस्त्यांची अवस्था आधीच बिकट झाली असताना पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी भरल्याने वाहनधारकांना मोठा मनस्ताप सोसावा लागला. दरम्यान, हतनूर धरणाच्या लाभक्षेत्रातील सुरू असलेल्या पावसामुळे हतनूर धरणाचे सहा दरवाजे पूर्ण तर दोन दरवाजे एक मीटर उंचीने उघडण्यात आले. धरणातून दोन हजार 100 क्युमेक्स प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग होत असून धरणात 88. 24 टक्के जलसाठा आहे. हतनूर धरणाचे गुरूवारी सकाळी नऊला आठ दरवाजे पूर्ण उघडे होते. नंतर सहा दरवाजे पूर्ण उघडे ठेऊन दोन दरवाजे एक मीटरने उघडे ठेवण्यात आले. धरणाच्या लाभक्षेत्रातल बर्हाणपूरला 13 मिलीमीटर, एरडी 15.6, चिखलदरा 2.0, लखपूरी 1.8, लोहारा 25.8 तर अकोला 2.2 मिलीमीटर पावसाची नोंद गुरूवारी सकाळी करण्यात आली. धरणात सायंकाळी 88.24 टक्के जलसाठा असल्याचे सूत्रांनी सांगितले.