ओबीसी आरक्षणाचा आम्हाला मार्ग सांगा, प्रश्न सोडवू : जयंत पाटील
नांदेड : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत अजिबात गरज नाही, ओबीसी आरक्षणाचा आम्हाला मार्ग सांगा, आम्ही तो प्रश्न सोडवतो अशा शब्दात जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीसांना टोला लगावला. रविवारी नांदेडात ते राष्ट्रवादीच्या परीवार संवाद यात्रेनिमित्त बोलत होते.
सत्ता नसेल तर महाराष्ट्रासाठी काहीच देणार नाही का?
यावेळी पाटील म्हणाले, सत्तेत आल्याशिवाय मी काहीच करणार नाही. सत्ता नसेल तर महाराष्ट्रासाठी काहीच देणार नाही, हा तर फडणवीसांचा दुटप्पीपणा आहे. फडणवीस यांनी सत्तेत येण्याची गरज नाही. आम्ही सरकार चालविण्यास सक्षम आहोत. त्यांनी फक्त आम्हाला मार्ग सांगावा. फडणवीसांनी ओबींसीचे नेतृत्व घ्यावे, असा सल्ला भूजबळांनी दिला आहे. त्यावर पाटील म्हणाले, भाजपाला आणि फडणवीसांना ऐवढाच कळवळा असता तर भूजबळांना एवढे वर्ष तुरुंगात खितपत ठेवले नसते. त्यांचे त्या काळात अतोनात हाल केले. एकनाथराव खडसे सारख्या नेत्याला त्रास देवून पक्ष सोडण्यास मजबूर केले. त्यामुळे आता ओबीसीसाठी आंदोलन करणे हे हास्यापद असल्याची टिका पाटील यांनी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, जयसिंगराव गायकवाड, डॉ.सुनिल कदम यांची उपस्थिती होती.




