जळगांव व बुलडाणा जिल्ह्यास दुष्काळ ग्रस्त घोषित करावे


खासदार रक्षाताई खडसेंचे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांना निवेदन

मुक्ताईनगर : यंपूर्ण महाराष्ट्र राज्याप्रमाणे जळगांव व बुलडाणा जिल्ह्यात हवामान अंदाज वेधशाळेने वर्तविल्या प्रमाणे कुठेही पाहिजे तसा पाऊस झालेला नसून जून महिन्याच्या सुरवातीपासूनच परीसरातील शेतकर्‍यांनी पिकांची पेरणी करून टाकली होती. जुलै महिना उजाडला तरी सुद्धा अजून पावसाचे कुठल्याही प्रकारचे हवामान दिसत नाही. पावसाच्या आशेवर नाईलाजास्तव दुबार पेरणी करून पावसाअभावी संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी जळगांव व बुलडाणा जिल्ह्यास दुष्काळ ग्रस्त घोषित करावे, असे निवेदन खासदार रक्षा खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच जळगांव व बुलडाणा जिल्ह्यांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व राजेंद्र शिंगणे यांना दिले आहे.

शेतकरी दुहेरी संकटात
पेरणी करून टाकलेल्या शेतकर्‍यांचे आधीच पावसाअभावी आर्थिकदृष्टया कंबरडेच मोडले गेलेले आहे. आधीच कोरोना महामारीचा सामना करीत शेतकर्‍यांनी बँकेतुन कर्ज काढून मोठ्या कष्टाने पिकांची लागवड केली होती. जळगांव व बुलडाणा जिल्हा वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस होत आहे. या पावसाच्या आशेवर पुन्हा तडजोड व उसनवारी करून शेतकर्‍यांनी दुबार पेरणी केलेली असून जुलै महिना अर्धा झाल्यावरही असून जळगांव व बुलडाणा जिल्ह्यात पाहिजे तसा पिकांयोग्य पाऊस पडलेला नाही. पावसाअभावी दुबार पेरणी करूनही शेतकर्‍यांच्या हाती काहीही येणार नाही असे वाटत आहे, असे खासदार रक्षा खडसेंनी निवेदनात म्हटले आहे.




शेतकर्‍यांना दिलासा देण्याची अपेक्षा
दुबार पेरणी करूनही पावसा अभावी आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून, शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार कडून जळगांव व बुलडाणा जिल्ह्यास दुष्काळ ग्रस्त घोषित करण्यात यावे, अशी मागणी खासदार रक्षा खडसेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच जळगांव व बुलडाणा जिल्ह्यांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व राजेंद्र शिंगणे यांच्याकडे केली आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !