माजी गृहमंत्र्यांना ईडीचा दणका : चार कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त
मुंबई : सक्तवसुली संचलनालयाने मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई पोलीस दलाचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या प्रकरणाचा तपास ईडीकडून सुरू असतानाच ईडीनं अनिल देशमुखांना चौकशीसाठी तीन समन्स बजावले होते व त्यानंतरही देशमुख ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहिले नाहीत. देशमुख यांच्या पत्नी आणि मुलगा यांनादेखील ईडीनं समन्स बजावलं होतं. मात्र हे दोघेही ईडीच्या कार्यालयात हजर राहिले नाहीत. 100 कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप देशमुख यांच्यावर आहे.
सोमय्यांच्या आरोपाने खळबळ
दरम्यान, लवकरच 100 कोटी जप्त होतील आणि देशमुखांवरदेखील जप्ती येईल’, असा दावा करत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी करीत देशमुखांच्या अटकेचे संकेत दिल्याने खळबळ उडाली आहे. सोमय्या यांच्या दाव्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी ईडी स्वायत्त संस्था आहे ना? मग त्यांच्या कारवाईची माहिती सोमय्यांना आधीच कशी मिळते? ते इतक्या विश्वासानं दावे कसे काय करतात? असे प्रश्न शिंदेंनी उपस्थित केले. ईडीनं सोमय्यांना वकिलपत्र दिलंय का असा सवालदेखील त्यांनी विचारला आहे.




