काँग्रेसचे ठरले : घटस्थापनेच्या मुहूर्तावर 110 उमेदवारांची आज होणार यादी जाहीर
नवी दिल्ली : घटस्थापनेच्या मुहूर्तावर काँग्रेसतर्फे 110 उमेदवारांच्या नावांवर काँग्रेसने शिक्कामोर्तब केले असून रविवारी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जारी केली जाण्याची शक्यता आहे. शुक्रवारी रात्री महाराष्ट्राचे प्रभारी व काँग्रेसचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खरगे यांनी उमेदवारी यादीचे अवलोकन केले. काँग्रेसच्या निवड समितीने मंजूर केलेल्या उमेदवारांची नावे यादीत असल्याची शहानिशा केली. हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीसाठीही काँग्रेसच्या उमेदवारांची निवड करण्याचे काम चालू आहे. येत्या एक-दोन दिवसांत ही यादीही जारी केली जाईल. उमेदवारांची यादी अंतिम करण्याच्या दृष्टीने गुलाम नबी आझाद, कुमार सैलजा, मधुसूदन मिस्त्रींसह अन्य नेते चर्चा करीत आहेत. एका कुटुंबातील एकाच सदस्याला उमेदवारी देण्याचा तत्त्वत: निर्णय काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेस नेतृत्वाच्या या निर्णयामुळे भूपेंद्र सिंह हुड्डा, किरण चौधरी, कुलदीप बिष्णोई आणि रणजित सिंह यांच्यासारख्या नेत्यापुढे पेच निर्माण झाला आहे. कारण या नेत्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांनी उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत.