राज्यातील पूर परीस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊनच भरपाई संदर्भात मदत जाहीर करणार : मुख्यमंत्री
रत्नागिरी : केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी लगेच काहीतरी घोषणा करणार नाही, राज्यातील पूर परीस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊनच नुकसानभरपाई संदर्भात मदत जाहीर करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधताना चिपळूण येथे सांगितले. वारंवार येणार्या नैसर्गिक आपत्तींचा विचार करून जिल्ह्याच्या स्तरावर याबाबत यंत्रणा उभारण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले. प्रश्न केवळ आर्थिक मदत पुरवणे असा नसून मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या नागरीकांना आणि व्यापार्यांना पुन्हा स्वतःच्या पायावर उभा करणे याला प्राथमिकता असेल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री चिपळूण दौर्यावर
मुख्यमंत्री आज चिपळूण दौर्यावर आले होते. त्यांनी चिपळूण शहरात व्यापारी तसेच नागरिकांशी संवाद साधला. आपल्या या भेटीदरम्यान त्यांनी बाजारपेठेत झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यानंतर झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी प्रशासनाकडून झालेल्या आतापर्यंतच्या बचाव व मदत कार्य याबाबत माहिती जाणून घेतली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.



यांची होती उपस्थिती
यावेळी पालकमंत्री अॅड. अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हा परीषद अध्यक्ष विक्रांत जाधव, खासदार विनायक राऊत, आमदार सर्वश्री भास्कर जाधव, राजन साळवी, शेखर निकम, मुख्य सचिव सिताराम कुंटे, माजी मंत्री रविंद्र माने, विभागीय आयुक्त विलास पाटील, जिल्हाधिकारी डॉ.बी.एन. पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी व्यापार्यांना दिला दिलासा
तुमच्या दुकानातील सामानाची नासधूस झाली. तुम्ही याची काळजी करू नका. तुम्हाला इजा झाली नाही ना. तुम्ही सर्व सुरक्षित आहात ना. तुमच्या मालाचं बघू, ते आमच्यावर सोडा, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणमधील व्यापार्यांना दिलासा दिला. यावेळी अनेक व्यापार्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडल्या. एका महिलेने तर मुख्यमंत्र्यांसमोर टाहोच फोडला. आम्हाला आश्वासन नको, मदत हवी आहे. आम्हाला सोडून जाऊ नका, आम्हाला मदत करा, असा टाहोच एका महिलेने फोडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 1 वाजता चिपळूणच्या मुख्य बाजारपेठेत पोहोचले. यावेळी त्यांनी गांधी चौकातील दुकानदारांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती जाणून घेतली. मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा थांबून व्यापार्यांशी चर्चा केली. यावेळी अनेक दुकानदारांनी पाणावलेल्या डोळ्यांनी मुख्यमंत्र्याकडे आपल्या व्यथा मांडल्या. मुख्यमंत्र्यांनीही या व्यापार्यांचे आणि स्थानिकांचं सांत्वन केलं. मुख्यमंत्री येणार म्हणून या बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली होती. या प्रसंगी त्यांच्यासोबत पालकमंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, मिलिंद नार्वेकर आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते.

