भाजपा सोडणार्यांची दुर्गती ; चोरी करणार्यांच्या मागे लागते ईडी
जळगावात भाजपाचे आमदार आशिष शेलार यांची माजी मंत्री खडसेंचे नाव न घेता टीका
जळगाव : ज्यांनी-ज्यांनी भाजप सोडला त्यांची दुर्गती झाली याची प्रचिती आगामी काळात आल्याशिवाय राहणार नाही शिवाय जे चोरी करतात त्यांच्या मागे ईडी लागते, अशी टीका भाजपचे आमदार आशीष शेलार यांनी खडसेंचे नाव न घेता येथे केली. जळगाव जिल्ह्याच्या दौर्यावर आले असता ते माध्यमांशी बोलत होते. सरकारी यंत्रणेने सातत्याने आकडे लपवले आहेत. सरकारचे खान्देशाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. आपण खान्देश दौरा करत असतांना माहिती मिळाली की, सुमारे दहा हजार हेक्टरवर दुबार पेरणी करावी लागली आहे. या भागात सरासरी इतका पाऊस देखील पडलेला नाही. यामुळे राज्य सरकारने कोणतीही पूर्वतयारी केल्याचे दिसून येत नाही. यामुळे केवळ घोषणा आणि फक्त सरकारकडे बोट दाखविण्याचे काम करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील ठाकरे सरकार हे माणसे जगवणारांचे नसून मृत्यू पडलेल्यांचे आकडे जाहीर करणारे सरकार असल्याची टीका शेलार यांनी यावेळी केली.
स्थानिक नेतृत्व बदलणार नाही
याप्रसंगी आमदार शेलार म्हणाले की, आ. गिरीश महाजन यांना बाजूला करण्याचा कोणताही विचार पक्षाने केलेला नाही. कोकणातील पूरग्रस्त परिस्थितीत ते मदतीला धावून गेले असल्याकडे देखील शेलार यांनी लक्ष वेधले. राज्याचे आणि स्थानिक नेतृत्व बदलणार नसल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले. एकनाथराव खडसे यांच्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, हा विषय आता जुना झाला आहे. आपण खडसे यांच्यावर वैयक्तीक टीका करणार नाही. तथापि, ज्यांनी भाजप सोडला त्यांची दुर्गती झाली आहे. येत्या निवडणुकांमध्ये दुध का दुध पानी का पानी होणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला. तर चोरी करणार्यांच्या मागे ईडी लागते, असा टोलादेखील आशीष शेलार यांनी मारला.




