सनावदच्या व्यापार्‍याला लुटणार्‍या आरोपीला भुसावळात बेड्या


भुसावळ बाजारपेठ व जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी : साडेचार लाखांचे लूट प्रकरण

भुसावळ- खरगोन जिल्ह्यातील धनगाव येथील किराणा व्यापार्‍याची तब्बल साडेचार लाखांची लूट करून तिघांनी पळ काढल्याची घटना 15 जून 2019 रोजी घडली. या गुन्ह्यातील संशयीतांचा शोध सुरू असताना एक संशयीत भुसावळात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून जळगाव स्थानिक गुन्हे शाखा व भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने संशयीत आरोपीला सोमवारी सकाळी भुसावळ रेल्वे स्थानकाच्या परीसरातून अटक केली. शिव संताराम नायक (27, रा.भगवानपुरा, खंडवा) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याच्या ताब्यातून विना सीमचा मोबाईल जप्त करण्यात आला. आरोपीला धनगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

धनगावच्या किराणा व्यापार्‍याला लुटून आरोपी पसार
खरगोन जिल्ह्यातील धनगावचे मोठे किराणा व्यापारी विनीशकुमार मदनलाल जैन (42, रा.सनावद, जि.खरगोन) हे 15 जून रोजी रात्री साडेदहा वाजता लगतच्या गावांना किराणा देवून सनावद गावाकडे परतत असताना बखरगाव-हवशपुरा गावानजीक विटभट्ट्यांजवळ दबा धरून बसलेल्या तिघांनी त्यांचे वाहन अडवून जैन यांना मारहाण करीत त्यांच्याकडील साडेचार लाखांची रोकड लांबवून पोबारा केला होता. या प्रकरणी धनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयीत भुसावळातील रेल्वे स्थानक परीसरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून त्याच्या सोमवारी संयुक्त कारवाईत मुसक्या आवळण्यात आल्या

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपअधीक्षक गजानन राठोडतसेच जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहम तसेच बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सुधाकर लहारे, हवालदार रवींद्र पाटील, शरीफोद्दीन काझी, दादा पाटील, युनूस शेख, दीपक पाटील तसेच भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल कृष्णा देशमुख, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी यांनी करीत आरोपीस ताब्यात घेतले. सुरुवातीला आरोपीने आपले नाव राजू ऊर्फ (काल्या) राजाराम सेन (रा.बर्‍हाणपूर, चिंचाला) असे सांगितले मात्र खोलवर चौकशी केल्यानंतर शिव संताराम नायक (27, रा. भगवानपुरा, खंडवा) नाव असल्याची आरोपीने कबुली दिली.

धनगाव पोलिसांनी आरोपी घेतला ताबा
आरोपीच्या अटकेबाबत धनगाव पोलिसांना कळवल्यानंतर उपनिरीक्षक आर.आर.चौव्हान व कॉन्स्टेबल अयाज शेख यांनी त्याचा ताबा घेतला तर आरोपीविरुद्ध आणखी एक गुन्हा त्याच्याविरुद्ध दाखल असल्याची माहिती पोलिसांनी देत त्या गुन्ह्यातील आरोपी वॉण्टेड असल्याचे सांगण्यात आले. आरोपीच्या ताब्यातून विना सीमचा एक मोबाईलही जप्त करण्यात आला.


कॉपी करू नका.